Sanjay Raut : ‘जरांगे मुख्य पात्र, बाकीचे एक्स्ट्रा कलाकार’; ऑडिओ क्लिपवरुन राऊतांचा खोचक टोला, केला हा मोठा दावा
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या ऑडिओ क्लिपबाबत मोठा दावा केला असून यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

‘ऑडिओ क्लिप फोडणारा आमदार मुख्यमंत्र्यांना माहिती आहे’
संजय राऊत यांनी दावा केला आहे की, ही ऑडिओ क्लिप भाजपच्या विधान परिषदेतील एका आमदारानेच समोर आणली आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती असूनही चौकशी का केली जात नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत. ते स्वतःला छोटे चाणक्य समजतात. त्यामुळे या प्रकरणातील घडामोडी त्यांना समजल्या पाहिजेत. ऑडिओ क्लिपमध्ये ज्या व्यक्तींमध्ये संभाषण सुरू आहे, त्या भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कोअर टीममधील आहेत. मग या प्रकरणात एसआयटी स्थापन करून चौकशी करण्याची गरज मुख्यमंत्र्यांना वाटत नाही का?”
‘५०० कोटींच्या व्यवहाराची चौकशी का नाही?’
या कथित ऑडिओ क्लिपमध्ये ५०० कोटी रुपयांच्या व्यवहाराचा उल्लेख असल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबत संजय राऊत म्हणाले की, “राजकीय नेते एकमेकांना अडचणीत आणण्यासाठी या क्लिपचा वापर करत आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या रकमेच्या व्यवहाराचा उल्लेख होऊनही चौकशी किंवा गुन्हा दाखल का होत नाही.”
‘जरांगे मुख्य पात्र, बाकीचे एक्स्ट्रा कलाकार’
या प्रकरणावर भाष्य करताना संजय राऊत यांनी खोचक निशाणा साधला. मनोज जरांगे हे मुख्य पात्र. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि इतर नेते हे या प्रकरणातील ‘एक्स्ट्रा कलाकार’ आहेत. मुख्यमंत्री या ऑडिओ क्लिपची चौकशी होईल, असे सांगत असले तरी प्रत्यक्षात ते खोटे बोलत असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच ही क्लिप नेमकी कोणी समोर आणली, हा या प्रकरणातील महत्त्वाचा मुद्दा असल्याचे त्यांनी नमूद केले.
फडणवीसांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष
संजय राऊत यांच्या या दाव्यामुळे ऑडिओ क्लिपवरून सुरू असलेला राजकीय वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. आता या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय प्रतिक्रिया देतात आणि या प्रकरणाच्या चौकशीबाबत सरकार काय भूमिका घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






