Bhor News: मृतदेह खांद्यावर अन् चिखलातून पायपीट! भोर तालुक्यातील अभेपुरी गावातील धक्कादायक वास्तव
Bhor News: स्वातंत्र्याला सात दशके उलटूनही भोर तालुक्यातील अभेपुरी गावात मूलभूत सुविधांचा मोठा अभाव; हक्काच्या स्मशानभूमीसाठी ग्रामस्थांची वर्षानुवर्षे प्रतीक्षा.

Bhor News – भोर तालुक्यातील अभेपुरी गावात आजही मूलभूत सुविधांचा मोठा अभाव असून, गावाला हक्काची स्मशानभूमी नसल्याने नागरिकांना तीव्र अडचणींचा सामना करावा लागत आहे. एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी दूरवर जावे लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात चिखलमय रस्ते, खराब हवामान आणि वाहतुकीच्या साधनांचा अभाव यामुळे मृताच्या नातेवाईकांना आणि ग्रामस्थांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
जिवंतपणी अनेक संकटांचा सामना करणाऱ्या येथील नागरिकांना मृत्यूनंतरही हालअपेष्टा सोसाव्या लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे. स्वातंत्र्याला सात दशके उलटूनही गावात ही प्राथमिक आणि अत्यंत महत्त्वाची सुविधा उपलब्ध न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. सध्या अंत्यसंस्कारासाठी शेड, पिण्याचे पाणी, वीज, अंत्ययात्रेकरूंसाठी बसण्याची व्यवस्था आणि सर्व ऋतूंमध्ये वापरता येईल असा पक्का रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे लावून धरली आहे. ग्रामपंचायतीने व संबंधित विभागाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन गावात सुसज्ज स्मशानभूमी उभारावी, अशी मागणी होत आहे.
माणसाला मृत्यूनंतर तरी सन्मान मिळावा
परिसरात स्मशानभूमी आणि योग्य रस्ता नसल्याने पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना परिस्थिती अत्यंत बिकट होते. अनेकदा मृतदेह खांद्यावर घेऊन चिखलातून वाट काढत जावे लागते. ‘माणूस जिवंत असताना त्याला हक्क मिळो ना मिळो, पण मृत्यूनंतर तरी किमान सन्मान मिळावा,’ अशी आर्त भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. वारंवार मागणी करूनही या संवेदनशील प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.





