Baramati News: स्मशानभूमीत आमरण उपोषण! जळगाव कडेपठार ग्रामपंचायतीत कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
Baramati News: बारामती तालुक्यातील जळगाव कडेपठार ग्रामपंचायतीमधील विविध विकासकामांत कोट्यवधींच्या कथित भ्रष्टाचाराविरोधात ग्रामस्थांचे स्मशानभूमीत आमरण उपोषण सुरू.

Baramati News – बारामती तालुक्यातील जळगाव कडेपठार ग्रामपंचायतीमधील विविध विकासकामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करीत ग्रामस्थांनी सोमवती अमावस्येच्या दिवशी थेट स्मशानभूमीत आमरण उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण दादा सखाराम घुले करीत असून गावातील महिला,युवक,ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत. उपोषणस्थळी ग्रामस्थांनी हातामध्ये विविध फलक घेत संबंधित विकासकामांतील कथित गैरव्यवहारांचा निषेध केला.
महिलांचा सहभाग विशेष लक्षणीय होता.अनेक वयोवृद्ध महिलांनी देखील आंदोलनस्थळी उपस्थित राहून भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविला. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांवर अनेक विकासकामांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप केला आहे. आंदोलनकर्त्यांच्या मते सॅनिटरी पॅड मशीन खरेदी प्रकरण,स्मशानभूमी विकासकाम,अंतर्गत रस्ते विकासकाम,समाजमंदिर बांधकाम व दुरुस्ती,परसबाग योजना, अंगणवाडी फिल्टर खरेदी, आर.ओ.फिल्टर प्रकल्प,पाणीपुरवठा दुरुस्ती कामे,
भूमिगत गटार योजना या सर्व कामांची स्वतंत्र चौकशी करून संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. उपोषणकर्त्यांनी अनेक वेळा निवेदने देऊन आणि पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस प्रतिक्रिया मिळत नसल्याचा आरोप केला आहे. प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत. मात्र, प्रत्यक्ष कारवाई होत नाही अशी तक्रार उपोषणकर्त्यांनी केली.
भ्रष्टाचाराच्या तक्रारी अनेकदा संबंधित कार्यालयांकडे सादर करण्यात आल्या. मात्र, अद्याप कोणत्याही जबाबदार व्यक्तीवर कठोर कारवाई झालेली नाही. त्यामुळेच अखेर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. बारामती तालुक्यातील जळगाव कडेपठारमधील हे आंदोलन सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरले असून प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
“जळगाव कडेपठार येथील उपोषणाबाबत संबंधितांना उपोषण मागे घेण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींची चौकशी सुरू असून पंचायत समितीच्या वतीने प्रतिनिधी घटनास्थळी पाठविण्यात आले आहेत.”
– किशोर माने, गटविकास अधिकारी,पंचायत समिती बारामती





