Bhimashankar Temple: भीमाशंकरमध्ये भाविकांचे हाल! ५ ते ६ तास रांगेत उभे राहूनही दर्शन मिळेना; भाविकांमध्ये तीव्र नाराजी
Bhimashankar Temple: पाच-पाच तास ताटकळत उभं राहावं लागल्याने भाविक बेजार; मोबाईल स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची अपुरी व्यवस्था समोर.

Bhimashankar Temple – श्री क्षेत्र भीमाशंकर येथे श्रावणपूर्व काळात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असताना मूलभूत सुविधांचा अभाव प्रकर्षाने जाणवत असल्याने भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.दर्शनासाठी पाच ते सहा तास रांगेत उभे रहावे लागत असून महिला,ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह आलेल्या कुटुंबांची मोठी गैरसोय होत आहे. दर्शन रांगेत मोबाईल स्वच्छतागृहांची व्यवस्था नसल्याने महिला भाविकांची विशेष कुचंबणा होत आहे.
पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सुविधा अपुरी असून लहान बाळांना दूध पाजण्यासाठी स्वतंत्र कक्षाचीही व्यवस्था नाही.बस स्थानकापासून मंदिराच्या दर्शन रांगेच्या प्रारंभापर्यंत पुरेसे सीसीटीव्ही कॅमेरे, बॅरिकेडिंग आणि सुरक्षारक्षक नसल्याने सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.मुसळधार पावसामुळे भाविकांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या मंदिर प्रशासनाकडून सकाळी ७ ते ११ या वेळेत दर्शनाची व्यवस्था केली जात असल्याने त्यानंतर येणाऱ्या हजारो भाविकांना दर्शन न घेता परतावे लागत आहे.
त्यामुळे भाविकांमध्ये नाराजी वाढत असून गर्दी नियंत्रणाचा अतिरिक्त ताण पोलीस प्रशासनावर येत आहे. मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकासकामांचा वेग वाढवून भाविकांसाठी दिवसभर दर्शनाची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, तसेच आवश्यक सुविधा तातडीने उभाराव्यात, अशी मागणी भाविकांनी श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट आणि जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
“भाविकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी देवस्थान प्रशासन प्रयत्नशील आहे.सुरू असलेली विकासकामे पूर्ण झाल्यानंतर स्वच्छता, सुरक्षा, पिण्याचे पाणी,मातांसाठी स्वतंत्र कक्ष आणि दर्शन व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.”
– सुरेश कौदरे,अध्यक्ष, देवस्थान ट्रस्ट श्री क्षेत्र भीमाशंकर.





