Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीला विठ्ठल मंदिरांमध्ये अलोट गर्दी! पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांची रीघ
Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीनिमित्त शहरातील विविध विठ्ठल मंदिरांत पहाटेपासूनच भाविकांची गर्दी; काकड आरती आणि अभिषेकाने भक्तिमय वातावरणात सुरुवात.

Ashadhi Ekadashi – आषाढी एकादशीनिमित्त शहरातील विविध विठ्ठल मंदिरांमध्ये शनिवारी पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. ज्यांना आषाढ एकादशीला पंढरपूरला जाता येत नाही ते सर्व भाविकभक्त शहरासह उपनगरातील मंदिरांमध्ये श्रीविठ्ठलाच्या दर्शनाचा आनंद घेतात. कपाळी केशरी टिळा, गळ्यात टाळ आणि पारंपरिक वेशात आलेल्या भाविकभक्तांनी विठ्ठल दर्शनाचा लाभ घेतला.
तसेच, वारकऱ्यांच्या विठ्ठल-विठ्ठल आणि ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषामुळे परिसर भक्तिमय झाला. विठ्ठलवाडीसह पालखी विठोबा मंदिर, निवडुंगा विठ्ठल मंदिर, पासोड्या विठ्ठल मंदिर, श्री खंडुजीबाबा विठ्ठल मंदिर, लाकडीपूल विठ्ठल मंदिर, प्रेमळ विठोबा मंदिर, खजिना विहीर विठ्ठल मंदिर, नवी पेठ आणि सदाशिव पेठेतील विठ्ठल मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. पहाटे अभिषेक, काकड आरती, भजन-कीर्तन आणि प्रवचनाचे कार्यक्रम पार पडले.
अनेक मंदिरांमध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. विठ्ठल-रखुमाईला तुळशीचे हार अर्पण करण्यात आले. भजन आणि नामस्मरणात सहभागी होत भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. दर्शनासाठी कुटुंबासह आलेल्या भाविकांची संख्याही लक्षणीय होती. मंदिर परिसरात स्वयंसेवकांकडून गर्दीचे नियोजन करण्यात आले होते. विविध सामाजिक संस्था आणि मंडळांनी भाविकांसाठी साबुदाणा खिचडी, फळे, पाणी आणि इतर उपवासाचे पदार्थ वाटप केले.
मंदिर परिसरात पूजेचे साहित्य, तुळशीच्या माळा, प्रसाद आणि खेळण्यांच्या दुकानांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. दर्शनानंतर अनेक भाविकांनी या दुकानांमधून खरेदी केली. दरम्यान, आषाढी एकादशीनिमित्त सोशल मीडियावरही विठ्ठलभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला. भाविकांनी विठ्ठलाच्या दर्शनाचे फोटो, व्हिडीओ आणि शुभेच्छा संदेश फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स आणि व्हॉट्सॲप स्टेटसवर शेअर केले.





