Pune District : भोरगिरी-भीमाशंकर परिसरात अतिवृष्टी
Pune District : मात्र सकाळी 10 ते दुपारी 2 या कालावधीत भोरगिरी, भीमाशंकर आणि वांद्रा परिसरात पुन्हा 150 ते 200 मिमी मुसळधार पाऊस झाल्याने धरणातील पाण्याची आवक झपाट्याने वाढली.

राजगुरुनगर : भोरगिरी-भीमाशंकर परिसरात गेल्या 24 तासांत झालेल्या 200 ते 250 मिमी अतिवृष्टीमुळे चासकमान धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. धरण 99 टक्के भरल्याने खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे पाचही दरवाजे एक फूटांपेक्षा अधिक उघडण्यात आले असून 29 हजार 793 क्युसेक वेगाने भीमा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे भीमा नदीला पुराचे स्वरूप प्राप्त झाले असून नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
चासकमान पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सात वाजल्यापासून धरणातून 15 हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र सकाळी 10 ते दुपारी 2 या कालावधीत भोरगिरी, भीमाशंकर आणि वांद्रा परिसरात पुन्हा 150 ते 200 मिमी मुसळधार पाऊस झाल्याने धरणातील पाण्याची आवक झपाट्याने वाढली.
परिणामी दुपारी 12 वाजता विसर्ग 24 हजार 600 क्युसेक करण्यात आला. त्यानंतर पावसाचा जोर कायम राहिल्याने दुपारी 2 वाजल्यापासून विसर्ग वाढवून 29 हजार 793 क्युसेक करण्यात आला.
दुपारी तीननंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला, तरी धरणातील आवक कायम असल्याने परिस्थितीवर पाटबंधारे विभाग आणि प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.
धरणे भरली, नद्यांना पूर
दरम्यान, भामा-आसखेड धरण 92 टक्के भरले असून तेथून 2 हजार 926 क्युसेक वेगाने भामा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. तसेच कळमोडी धरण यापूर्वीच शंभर टक्के भरले असून तेथून 6 हजार क्युसेक वेगाने आरळा नदीमार्गे पाणी चासकमान धरणात दाखल होत आहे. त्यामुळे चासकमान धरणातील पाण्याची आवक आणखी वाढली आहे. अतिवृष्टीमुळे आरळा आणि भीमा नद्या दुथडी भरून वाहत असून नदीवरील अनेक कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्यांवर पुराचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात अथवा पुराच्या पाण्यात उतरू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन चासकमान पाटबंधारे विभागाने केले आहे.





