पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- लतादीदीने शेवटपर्यंत माझी काळजी घेतली. तिच्या कंठात साक्षात ईश्वराचा अंश होता. वयाच्या पाचव्या वर्षापासून ती बाबांच्या सानिध्यात गात होती. विविध भाषांतील लहेजा, शब्द समजून घेत ती सर्व प्रकारची गाणी गायची. तिने गायलेली सर्वच गाणी अजरामर झाली आहेत. तिच्यात संवेदनशीलपणा होता.
सामाजिक जाणीव होती. लतादीदीच्या जाण्याने संगीत सागरातील एक हिमनग कोसळला आहे. दोन वर्षांनंतरही मी पूर्णपणे सावरलेलो नाही, अशा शब्दांत लतादीदींचे बंधू भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी लतादीदींविषयी आठवणी जागवल्या.
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त मंगेशकर कुटुंबियांच्या वतीने संगीत क्षेत्रातील सेवेबद्दल दिला जाणारा ‘दीदी पुरस्कार’ ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांच्या हस्ते गायिका विभावरी आपटे-जोशी यांना प्रदान करण्यात आला.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर, प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे, भारती मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, संयोजन समिती सदस्य आणि गायिका मनीषा निश्चल, निश्चल लताड आदी उपस्थित होते.
यावेळी सादर झालेल्या ‘विश्वमोहिनी लता दीदी’ या सांगीतिक मैफलीने रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह गायक राहुल देशपांडे, गायिका विभावरी आपटे-जोशी, मनीषा निश्चल, प्राची देवल, गायक श्रेयस बेडेकर यांनी लतादीदींची अजरामर गाणी सुरेल पद्धतीने सादर केली.
मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्याविषयी हृदयनाथ मंगेशकरांनी लिहिलेल्या आठवणींचे वाचन करत मास्टरजींच्या काही चीजा सादर केल्या. तसेच मंगेशकर आणि देशपांडे कुटुंबियातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. लतादीदींची काही गाणी आणि त्यातील बारकावे, त्यावेळचे किस्से मंगेशकर यांनी सांगितले.