नगर – तालुक्यातील भंडारदरा पाणलोटक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून, आज (शुक्रवार) घाटघरला 162 मिलिमीटर, रतनवाडी 165 मिलिमीटर, वाकी 129 मिलिमीटर, भंडारदरा 145 मिलिमीटर एवढा पाऊस झाल्याने भंडारदरा धरण 50 टक्के भरले आहे.
अकोले तालुक्यात मान्सून दाखल होऊन गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. भंडारदरा पाणलोटक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असून, ओढे-नाले खळखळून वाहू लागल्याने परिसरातील धबधबे कोसळत आहेत.सर्व परिसर निसर्गरम्य असून, डोंगर दऱ्यांनी हिरवा शालू परिधान केला आहे.
या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची रेलचेल वाढली आहे. आज भंडारदरा धरणात 368 दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली असून, धरणाचा पाणीसाठा 5 हजार 641 दशलक्ष घनफूट झाला आहे. भंडारदरा धरण 51 टक्के भरले आहे, तर निळवंडे धरणात दिवसभरात 72 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक होऊन धरणातील पाणीसाठा 1 हजार 768 दशलक्ष घनफूट होऊन निळवंडे धरण 21.23 टक्के भरले आहे.
भंडारदरा धरणातून 837 क्युसेकने, तर निळवंडे धरणातून 750 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. धरणाच्या पाणलोटक्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने आदिवासी शेतकरी भातरोपे लागवडीच्या तयारीला लागले आहेत. उत्तर नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.