Bhabiji Ghar Par Hain : शिल्पा शिंदे पुन्हा बनणार ‘अंगुरी भाभी’; ९ वर्षाचा ‘तो’ वाद अखेर मिटणार !

Shilpa Shinde । Bhabiji Ghar Par Hain – टीव्ही जगातील सर्वात लोकप्रिय कॉमेडी शो ‘भाभी जी घर पर हैं’ संदर्भात एक मोठी आणि चर्चेची बातमी समोर आली आहे. ९ वर्षांपूर्वी वादामुळे शो सोडणारी अभिनेत्री शिल्पा शिंदे पुन्हा एकदा ‘अंगुरी भाभी’च्या भूमिकेत पुनरागमन करू शकते, अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या या शोमध्ये अंगुरी भाभीची भूमिका साकारणारी शुभांगी अत्रे यांना रिप्लेस करण्यासाठी मेकर्सनी शिल्पा शिंदेशी प्राथमिक चर्चा सुरू केली आहे. दोन्ही पक्षांमधील चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच अधिकृत निर्णय घेतला जाऊ शकतो.
शिल्पा शिंदे पुन्हा शोमध्ये येण्यास तयार झाल्यास, कार्यक्रमाला नव्या स्वरूपात म्हणजेच ‘भाभी जी घर पर हैं 2.0’ या मेकओव्हर आवृत्तीत सादर केले जाणार आहे. असं सांगितलं गेलं आहे. सध्या हा शो अँड टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय कॉमेडी शो म्हणून ओळखला जातो.
‘त्या’ वादानंतरचा पुनरागमनाचा प्रवास :
शिल्पा शिंदेने २०१६ मध्ये अचानक शो सोडल्याने त्यावेळी प्रचंड वाद निर्माण झाला होता. तिने निर्मात्यांवर “मानसिक छळ” केल्याचा आरोप करत, गैरसोयीच्या करारावर सही करण्यास दबाव टाकण्यात येत असल्याचा दावा केला होता. प्रोडक्शन हाऊसने त्यानंतर तिला कायदेशीर नोटीस पाठवली होती.
शो सोडल्यानंतर शिल्पा फारशा मालिकांमध्ये दिसली नाही. मात्र, ती ‘बिग बॉस 11’ ची विजेती ठरली आणि ‘खतरों के खिलाडी 14’ तसेच ‘मैडम सर’ सारख्या कार्यक्रमांमध्ये झळकली. शिल्पा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते, तिचे लाखोंच्या घरात फॉलोवर्स आहेत.





