Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्…; तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?
Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकर यांनी एका मुलाखतीत या प्रसंगाची आठवण सांगितली होती. ‘परिंदा’च्या चित्रीकरणावेळी दिग्दर्शनावरून नाना आणि विधू विनोद चोप्रा यांच्यात अनेकदा मतभेद व्हायचे.

Nana Patekar Parinda movie : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या बातमीने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. आपल्या दमदार अभिनयाने आणि प्रभावी संवादफेकीने त्यांनी हिंदी तसेच मराठी सिनेसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिका गाजल्या. मात्र, त्यांच्या अभिनयाइतक्याच त्यांच्या चित्रपटांच्या सेटवरील अनेक किस्से देखील आजही आठवले जातात.
असाच एक रंजक किस्सा १९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘परिंदा’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा आणि नाना पाटेकर यांच्यात सेटवर अनेकदा वाद होत असल्याचं दोघांनीही एका कार्यक्रमात सांगितलं होतं. या चित्रपटात नानांनी अण्णा या खलनायकाची भूमिका साकारली होती.
नाना पाटेकर यांनी एका मुलाखतीत या प्रसंगाची आठवण सांगितली होती. ‘परिंदा’च्या चित्रीकरणावेळी दिग्दर्शनावरून नाना आणि विधू विनोद चोप्रा यांच्यात अनेकदा मतभेद व्हायचे. दोघेही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने वाद कधी कधी टोकाला जायचा.
‘सा रे गा मा पा’ या कार्यक्रमात विधू विनोद चोप्रा यांनीही या किस्स्याला उजाळा दिला होता. त्यांनी सांगितलं होतं की, त्यांनी नाना पाटेकर यांना ‘पुरुष’ या नाटकात पाहिलं होतं. त्यानंतर परिंदामध्ये नानांनी अण्णाची भूमिका करावी यासाठी ते आग्रही होते.
मात्र, ‘परिंदा’च्या सेटवर काम करताना दोघांमध्ये वारंवार शाब्दिक चकमकी होत असतं. दिवसभर शूटिंग केल्यानंतर नाना पाटेकर थकले होते. त्यांनी घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली. यावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद इतका वाढला की, प्रकरण थेट हाणामारीपर्यंत पोहोचलं. रागाच्या भरात विधू विनोद चोप्रा यांनी नाना पाटेकर यांचा कुर्ता फाडला.
मात्र, याचवेळी कॅमेरामन विनोद प्रधान ‘शॉट तयार आहे’ असा मोठ्याने ओरडला. यानंतर क्षणाचाही विलंब न करता चोप्रा फ्रेमच्या बाहेर गेले आणि नाना पाटेकर कॅमेऱ्यासमोर आपल्या भूमिकेत उभे राहिले.विशेष म्हणजे, ज्या सीनचं शूटिंग सुरू होतं, त्यात नाना पाटेकर यांच्या पात्राला भावनिक प्रसंगाचा सामना करावा लागतो हे दाखवण्यात आलं होतं.
फाटलेल्या कुर्त्यामुळे नाना पाटेकर बनियानमध्येच कॅमेऱ्यासमोर उभे राहिले. त्यांच्या डोळ्यांत आलेले अश्रूही खरे होते आणि हा सीन शूट झाला. काही क्षणांपूर्वी झालेल्या भांडणाचा परिणाम त्यांच्या अभिनयात नैसर्गिकपणे उमटला. पुढे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हाच सीन चित्रपटातील अॅायकॅानिक सीन बनला.
विधू विनोद चोप्रा यांनी सांगितलं होतं की, शूटिंग पूर्ण झाल्यानंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारली. नाना पाटेकर यांनीही त्या सीनबद्दल आपण खूप चिंतेत असल्याचं सांगितलं होतं. अभिनयातील सहजता, भावनिक खोली आणि प्रसंगाला जिवंत करण्याची ताकद या एका किस्स्यातूनही प्रकर्षाने जाणवते.
Nana Patekar: ‘सरकार, कशा आहात?’ नाना पाटेकरांच्या आठवणीत मेधा मांजरेकरांची भावुक पोस्ट





