Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी
यापूर्वी ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, सलमान खान, श्री श्री रविशंकर, पत्रकार सुधीर चौधरी, पॉडकास्टर राज शमानी, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि क्रिकेटपटू अभिषेक शर्मा यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी व्यक्तिमत्व आणि प्रसिद्धी हक्कांच्या संरक्षणासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.

Kangana Ranaut – अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत यांनी आपल्याबद्दल ऑनलाइन उपलब्ध असलेला काही एआय – निर्मित आणि अश्लील मजकूर हटवण्याच्या मागणीसाठी गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. आपल्या ‘पर्सनॅलिटी राइट्स’च्या संरक्षणासाठी त्यांनी ही याचिका दाखल केली आहे.
न्यायमूर्ती विकास महाजन यांनी याचिकेवरील प्रतिवादींना समन्स बजावत, प्रकरणात अंतरिम आदेश दिला जाईल, असे संकेत दिले. कंगना रणौत यांच्या वकिलांनी लैंगिक आणि अश्लील स्वरूपाचा ग्राफिक मजकूर, फेक न्यूज तसेच रणौत यांच्या नावाने चुकीची विधाने जोडणाऱ्या एआय -निर्मित सामग्रीवर आक्षेप घेतला.
मात्र, मीम्स आणि इतर आक्षेपार्ह उपहासात्मक सामग्री अस्तित्वात असली तरी अंतरिम दिलाशाच्या टप्प्यावर त्याविरोधात कोणताही आदेश मागितला जात नसल्याचे त्यांच्या वकिलांनी स्पष्ट केले.
याच सुनावणीत तेलगू अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या व्यक्तिमत्व हक्कांशी संबंधित स्वतंत्र याचिकेवरही न्यायालयाने समन्स बजावले. त्यांच्या वकिलांनी एआय – निर्मित सोशल मीडिया पोस्ट, तोतयागिरी, चुकीच्या पद्धतीने केलेल्या उत्पादनांच्या जाहिराती आणि अश्लील मजकुरासह त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अनधिकृत व्यावसायिक वापर होत असल्याचा आरोप केला.
यापूर्वी ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, सलमान खान, श्री श्री रविशंकर, पत्रकार सुधीर चौधरी, पॉडकास्टर राज शमानी, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि क्रिकेटपटू अभिषेक शर्मा यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी व्यक्तिमत्व आणि प्रसिद्धी हक्कांच्या संरक्षणासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. काही प्रकरणांत उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासाही दिला आहे.





