Maharahstra Byelection : विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे 40 स्टार प्रचारक जाहीर, ‘या’ एका नावाची जोरदार चर्चा
Maharahstra Byelection :

Maharahstra Byelection : बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी प्रचाराला वेग येऊ लागला असून भाजपने 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, आमदार गोपीचंद पडळकर यांनाही स्टार प्रचारक म्हणून स्थान देण्यात आले आहे.
भाजपकडून जाहीर करण्यात आलेली ही यादी निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली आहे. पवार कुटुंबीयांवर सातत्याने टीका करणारे म्हणून ओळख असलेले गोपीचंद पडळकर यांनी यापूर्वी विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.
दरम्यान, बारामतीत होत असलेल्या या पोटनिवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या मैदानात असून महायुतीकडून त्यांच्यासाठी जोरदार प्रचाराची तयारी सुरू आहे. तर राहुरी मध्ये शिवाजीराव कर्डीले यांचे पुत्र अक्षय कर्डीले भाजपकडून निवडणूक लढवत आहेत.
पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने शेवटच्या दिवशी माघार घेतली आहे. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता एकूण 23 उमेदवार रिंगणात शिल्लक राहिले असून निवडणूक निश्चित झाली आहे.
भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत अतुल सावे, मेघना बोर्डीकर, अशोक उईके, चित्रा वाघ, प्रवीण दरेकर, डॉ. भागवत कराड, डॉ. संजय कुटे, धनंजय महाडिक, मायाताई इवनाते, भारती पवार, रामराव वडकुते, डॉ. सुजय विखे पाटील, योगेश टिळेकर, अमित गोरखे, मोनिका राजळे, राहुल कुल आणि इद्रीस मुलतानी यांचाही समावेश आहे.
या दोन्ही मतदारसंघांसाठी मतदान 23 एप्रिल रोजी होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत प्रचारसभा, दौरे आणि राजकीय घडामोडींना अधिक वेग येण्याची शक्यता आहे.





