Baramati Plane Crash – राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळावर लेअरजेट विमान लँडिंगदरम्यान रनवेच्या बाजूला कोसळून दुर्दैवी निधन झाले होते. या दुर्घटनेचा तपास सुरुवातीला बारामती पोलिसांकडून सुरू होता. मात्र, राज्य सरकारच्या आदेशानुसार हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, नागरी उड्डाण मंत्रालयाची केंद्रीय यंत्रणा एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन कमिटी (एएआयसी) तांत्रिक बाबींच्या आधारे सखोल चौकशी करत असून, त्यांचा अंतिम अहवाल आल्यानंतरच सीआयडीच्या पुढील तपासाला ठोस दिशा मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.मुंबईहून बारामतीकडे जात असताना संबंधित विमानात कोणता बिघाड झाला होता का, याचाही तपास सुरू आहे. विमानाचे पायलट कॅप्टन सुमित कपूर असून को- पायलट म्हणून शांभवी पाठक कार्यरत होत्या. दोघांची पार्श्वभूमी, उड्डाणापूर्वीचे संपर्क, ड्युटी रेकॉर्ड, कॉल डिटेल्स, तसेच मानसिक स्थिती यांचीही सीआयडीकडून पडताळणी केली जात आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या प्राथमिक माहितीनुसार, विमानाला रन वेवर उतरण्याची परवानगी दिल्यानंतर पायलटकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर अवघ्या एका मिनिटात एटीसीला रनवे परिसरात आगीचे लोळ दिसून आले. अपघातापूर्वी कोणताही ‘मेडे कॉल’ किंवा आपत्कालीन सूचना देण्यात आलेली नव्हती. त्यानंतर बारामतीतील गोजुबावी परिसरात विमान कोसळले आणि या भीषण दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. आता एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन कमिटीचा अंतिम अहवाल आल्यानंतर अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता असून, त्यानुसार सीआयडी पुढील गुन्हेगारी तपासाची दिशा निश्चित करणार आहे.