Ajit Pawar Plane Crash : रिपोर्ट व्हायरल झाला पण सीआयडीला माहितीच नाही? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
Ajit Pawar Plane Crash : डीजीसीएचा अहवाल प्रसिद्ध होऊनही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ; रोहित पवारांनी मांडली कायदेशीर बाजू, तपासावर व्यक्त केला संशय.

Ajit Pawar Plane Crash – सीआयडी कार्यालयात भेट दिल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत विमान अपघात प्रकरणात गुन्हा दाखल न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. पवार म्हणाले, की डीजीसीएने या विमान अपघातासाठी व्हीएसआर कंपनीला जबाबदार धरल्याचे अहवालातून समोर आले आहे. २४ फेब्रुवारी रोजी हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर मी स्वतः मुंबईला जाऊन गुन्हा दाखल करण्याची विनंती केली. मात्र, आमचा एफआयआर नोंदवून घेण्यात आला नाही.
मुंबई आणि बारामती पोलिसांचे असहकार्य
ते म्हणाले, आज मी बारामतीला गेलो होतो. तिथे तीन तास आणि मुंबईतही तीन तास पोलीस ठाण्यात बसून राहिलो, तरीदेखील एफआयआर दाखल करण्यात आला नाही. एफआयआर नोंदवून घेणे हा आमचा कायदेशीर अधिकार आहे. आम्हाला सांगण्यात आले, की अजितदादांच्या अपघाती मृत्यूची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली असून, तपास सुरू आहे.
मात्र, डीजीसीएने कंपनीला जबाबदार धरले असताना अद्याप गुन्हा का दाखल झाला नाही? सीआयडी तपास करत असल्यामुळे पोलीस एफआयआर घेऊ शकत नाहीत, असे आम्हाला सांगितले. मात्र, असा कोणताही नियम नाही. अकस्मात मृत्यूची नोंद झाल्यानंतरही एफआयआर करता येतो, असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. त्यामुळेच आम्ही सीआयडी प्रमुखांची भेट घेण्याचा निर्णय घेतला.
सीआयडीकडून ठोस माहिती नाही
सीआयडीच्या पत्रकार परिषदेबाबत ते म्हणाले, आमच्या भेटीपूर्वी सीआयडीने पत्रकार परिषद घेतली. लोकांच्या दबावामुळे का असेना, २७ दिवसांनंतर त्यांनी भूमिका मांडली, ही चांगली बाब आहे. संबंधित अधिकारी चांगल्या प्रतिमेचे आहेत. मात्र, पत्रकार परिषदेत तपासासंदर्भात ठोस माहिती दिली नाही.
डीजीसीएच्या अहवालाबाबत माहिती अपेक्षित होती; परंतु तो अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले. अहवाल सार्वजनिक पातळीवर व्हायरल झाला असताना तपास यंत्रणांकडे तो उपलब्ध नसणे अनाकलनीय आहे.
घातपाताची शंका; पुरावे सीआयडीकडे
मी कोणाचेही वैयक्तिक नाव घेतलेले नाही. मात्र, या घटनेमागे जो कोणी जबाबदार असेल, त्याचा निष्पक्ष तपास झाला पाहिजे. डीजीसीएने जबाबदारी निश्चित केल्यानंतरही व्हीएसआरवर एफआयआर का होत नाही? यामुळे घातपाताची शंका निर्माण होते. त्यामुळे देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून मी गोळा केलेले सर्व पुरावे सीआयडीकडे सुपूर्द केले आहेत, असेही पवार यांनी सांगितले.




