Pune News : छोट्या विमानाची उपयोगीत वाढणार; हेलिकॉप्टर अँड स्मॉल एअरक्राफ्ट परिषद संपन्न

पुणे : नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने महाराष्ट्र सरकार, पवनहंस आणि फिक्की यांच्या सहयोगाने पुणे येथे सातव्या हेलिकॉप्टर अँड स्मॉल एअरक्राफ्ट परिषदेचे आयोजन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू किंजरापू, तर सन्माननीय अतिथी म्हणून नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.
राममोहन नायडू किंजरापू म्हणाले की, भविष्यकालीन विमान वाहतूक परिसंस्थेचे आवश्यक घटक म्हणून हेलिकॉप्टर आणि लहान विमानांना प्रोत्साहन द्यायला हवे. ते म्हणाले, पुढील दशकातील विमान वाहतूक केवळ मोठी विमाने आणि मोठ्या विमानतळांद्वारे नव्हे तर आधुनिक आणि समावेशक हवाई उपायांद्वारे परिभाषित केली जाईल.
मंत्र्यांनी एक समर्पित हेलिकॉप्टर संचालनालय स्थापन करण्याची घोषणा केली. ऑपरेटर्स आणि उद्योग क्षेत्रातील नेत्यांशी बोलताना, त्यांनी मजबूत सुरक्षा संस्कृती तयार करण्यावर भर दिला. ते म्हणाले, प्रवाश्यांची सुरक्षा ही आपली सर्वोच्च प्राथमिकता असायला हवी. हेलिकॉप्टर आणि लहान विमाने भारताची प्रादेशिक हवाई कनेक्टिव्हिटी, आर्थिक परिवर्तन आणि सर्वसमावेशक विकासाचा कणा बनतील.
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या भाषणात अनेक महत्त्वाच्या उपक्रमांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, आम्ही आमच्या हवाई वाहतूक प्रणालींचे आधुनिकीकरण करत आहोत, हरित इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देत आहोत आणि शतढजङ सारख्या भविष्यकालीन विमानांना धोरणात्मक प्राधान्यांच्या क्षेत्रात आणत आहोत.
आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेवर भर देताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, विमान वाहतूक क्षेत्रात स्वावलंबी होण्याच्या दिशेने, आम्ही वैमानिक, देखभाल कर्मचारी, ड्रोन ऑपरेटर आणि रोटरक्राफ्ट तंत्रज्ञांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहोत. यामुळे येत्या दशकात आपले तरुण केवळ या क्षेत्रात सहभागी होणार नाहीत, तर त्याचे नेतृत्वही करतील.





