Vande Bharat Train : मुंबई-कोकण मार्गावर वंदे भारत ट्रेनचा अपघात; मोकाट जनावरांना धडकली ट्रेन
Vande Bharat Train : मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसची कुडाळजवळ गुरांना धडक बसल्याने ओएचई उपकरणांचे नुकसान झाले आहे.

Vande Bharat Train : कुडाळ आणि सिंधुदुर्ग स्थानकांदरम्यान वंदे भारत रेल्वेची गुरांना धडक बसल्याने ओव्हरहेड इक्विपमेंटचे (ओएचई) नुकसान झाले आहे. त्यामुळे सोमवारी मुंबई-गोवा या व्यस्त मार्गावरील रेल्वे वाहतूक काही तासांसाठी विस्कळीत झाली होती. ही घटना कोकण रेल्वे मार्गावर सकाळी ११:३० वाजता घडली आहे.
गोव्यातील मडगावच्या दिशेने जाणाऱ्या या ट्रेनने रुळांवर आलेल्या तीन गुरांना धडक दिली, ज्यामुळे वीज पुरवठा करणाऱ्या ओएचईचे नुकसान झाले. धडकेमुळे ओएचई लावलेल्या खांब वाकला. या विभागातील वाहतूक सुमारे तीन तास विस्कळीत झाली होती.
दुपारी २:३० वाजल्यानंतर रेल्वे वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात आली. खराब झालेल्या उपकरणांची दुरुस्तीसाठी पॉवर ब्लॉक घ्यावा लागला होता. मार्ग पूर्ववत झाल्यानंतर काही तासांच्या विलंबाने वंदे भारत एक्स्प्रेस गोव्याच्या दिशेने पुन्हा रवाना झाली.
चाकरमान्यांना मोठा फटका
कोकणची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील मसूरे आंगणेवाडीमधील श्री देवी भराडी मातेचा जत्रोत्सवाला 9 फेब्रुवारीपासून सूरूवात झाली आहे. या यात्रेसाठी मोठ्या संख्यने चाकरमानी मुंबईहून कोकणाच्या दिशेने निघाले आहेत. तर काही लोकांनी परतीच्या प्रवासालाही सुरुवात केली आहे.


