Baramati Bypoll 2026 – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून, दि. २3 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियुक्त नोडल अधिकाऱ्यांची उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक झाली. या बैठकीत पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने विविध विभागांना सोपविल्या जबाबदाऱ्यांचा आढावा घेण्यात आला. मतदान प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व नियमानुसार पार पडावी यासाठी आवश्यक नियोजन, मनुष्यबळाची उपलब्धता, साहित्य वितरण, प्रशिक्षण कार्यक्रम, तसेच आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सूचना देण्यात आल्या. या वेळी मतदान केंद्रांची तयारी, ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रांची तपासणी, माध्यम कक्ष कामकाज, मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, तसेच मतदार जागृती उपक्रम राबविण्याबाबतही चर्चा करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सर्व नोडल अधिकाऱ्यांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश कळसकर यांनी दिले.