Baramati Farmer Protest: “आता आश्वासन नको, पाणी द्या!” जनाई-शिरसाईच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक; उपोषणाचा इशारा
Baramati Farmer Protest: जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेचे पाणी नियमित मिळण्यासाठी शेतकरी संघर्ष कृती समितीचा लढा; सुपे येथे आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात.

Baramati Farmer Protest: जनाई- शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरेसे व नियमित पाणी मिळावे, या मागणीसाठी शेतकरी संघर्ष कृती समितीने आता निर्णायक आंदोलनाची भूमिका घेतली आहे. महात्मा गांधी जयंतीदिनी शुक्रवार (दि.२) ऑक्टोबर रोजी सकाळी १० पासून बारामती तालुक्यातील सुपे येथे आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे समितीने जाहीर केले आहे.
“आता आश्वासन नको, प्रत्यक्ष पाणी हवे” अशी भूमिका घेत शेतकरी संघर्ष कृती समितीने योजनेतील विविध प्रश्न प्रशासनासमोर मांडले आहेत. श्री शहाजीराजे भोसले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत हे आंदोलन होणार असल्याचे पत्रकात नमूद केले आहे. समितीच्या प्रमुख मागण्यांमध्ये बंद पाइपलाइनमुळे वाया जाणारे पाणी पुणे महानगरपालिकेला न देता कार्यक्षेत्रातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या शेतीसाठी उपलब्ध करून देणे,
बंद पाइपलाइन सुरू करताना तलावांची साठवण क्षमता लक्षात घेऊन आवश्यक त्या व्यासाची पाइपलाइन करणे, जुन्या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देणे, या मागण्यांचा समावेश आहे. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी जनाई- शिरसाईतील तलावांमध्ये साठवण्यासाठी बंधारा व पंपगृह उभारावे, जनाई–शिरसाई योजना पूर्णपणे सौरऊर्जेवर आणावी,
शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी वर्षभराचे नियोजन करावे, आदी मागण्या केल्या आहेत.जनाई–शिरसाई योजनेचे कार्यालय सुपे येथेच करण्यात यावे, तसेच वडगाव तलावाची साठवण क्षमता कमी असल्यामुळे पाणी पुरेसे मिळत नसल्यास त्यावर कार्यवाही करावी, अशीही मागणी समितीने केली आहे.
आता केवळ आश्वासनांवर थांबणार नाही
दरम्यान, शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न आता केवळ आश्वासनांवर थांबणार नाही; प्रत्यक्ष अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका” समितीने घेतल्याचे पत्रकातून स्पष्ट झाले आहे. योजनेचे पाणी तलावात शिल्लक असताना शेतकऱ्यांकडून पंप बंद पाडले जात असल्याचा आरोपही समितीने केला आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली आहे.





