EVM Security : ईव्हीएम ‘स्ट्राँग रूम’मध्ये सील! 24 तास सीसीटीव्हीचा पहारा अन् कडेकोट पोलीस बंदोबस्त
EVM Security : नोडल अधिकारी सचिन आखाडे यांच्याकडून तांत्रिक व्यवस्थापन; सील प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण आणि नोंदींचे काटेकोर पालन.

EVM Security – हवेली तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी वापरण्यात आलेल्या ईव्हीएम यंत्रांची सुरक्षितता राखण्यासाठी निवडणूक कार्यालयातील स्ट्राँग रूममध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. स्ट्राँग रूम परिसरावर 24 तास सीसीटीव्ही कॅमेर्यांद्वारे सतत निगराणी ठेवण्यात येत असून, मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी दिली.
मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व ईव्हीएम यंत्रे स्ट्राँग रूममध्ये ठेवून सील करण्यात आली असून, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित व नियमबद्ध पद्धतीने राबविण्यात आली असल्याचे डॉ. माने यांनी स्पष्ट केले. अधिकृत परवानगीशिवाय कोणालाही स्ट्राँग रूम परिसरात प्रवेश दिला जात नसल्याचेही त्यांनी सांगितले.
निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने, सहायक निवडणूक अधिकारी अर्चना निकम, तृप्ती कोलते तसेच माध्यम अधिकारी प्रा. योगेश हांडगे आणि माध्यम कक्षाचे राम कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सुरक्षा व तांत्रिक व्यवस्थापन राबविण्यात येत आहे. नोडल अधिकारी सचिन आखाडे यांच्या समन्वयातून मतदानाच्या दिवशी ईव्हीएमशी संबंधित सर्व तांत्रिक बाबी प्रभावीपणे हाताळण्यात आल्या.
या तांत्रिक व सुरक्षा व्यवस्थेमध्ये सचिन आखाडे, किशोर पाटील, गजानन किरवले, महादेव दुधाळ, विवेक गावंडे, राजू राजपुरे व अनिल पाटील या अधिकार्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मतमोजणीपर्यंत ईव्हीएम यंत्रे सुरक्षित राहावीत यासाठी निवडणूक अधिकारी, पोलीस प्रशासन व सुरक्षा यंत्रणेकडून नियमित तपासणी करण्यात येत आहे.
स्ट्राँग रूम कडेकोट बंदोबस्त, सीसीटीव्ही व्यवस्था, सील प्रक्रिया व प्रशासनाची सतर्कता यामुळे नागरिक व राजकीय प्रतिनिधींमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरक्षित, पारदर्शक व विश्वासार्ह असल्याचा विश्वास निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी व्यक्त केला आहे.





