Rohingya crisis : रोहिंग्यांच्या प्रश्नी बांगलादेशला हवयं भारताचे सहकार्य

ढाका – रोहिंग्यांच्या प्रश्नासंदर्भात बांगलादेशने भारताचे सहकार्य मागितले आहे. म्यानमारमधून विस्तापित झालेल्या लाखो रोहिंग्यांनी बांगलादेशात आश्रय घेतला आहे. मात्र या रोहिंग्यांना शांततेने परत म्यानमारमध्ये पाठवण्याच्या मुद्यावर बांगलादेशने भारताचे सहकार्य मागितले आहे.
बांगलादेशच्या संसद भवनामध्ये भारताचे राजदूत प्रणय कुमार आणि बांगलादेशच्या संसदेच्या सभापती शिरीन शरमीन चौधरी यांची बेट झाली असता चौधरी यांनी ही सहगकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
बांगलादेशच्या स्वातंत्र्य युद्धाच्यावेळी 1971 मध्ये भारताने बांगलादेशींना आश्रय दिला होता. बांगलादेशला याची आठवण आहे. आता बांगलादेशने मोठ्या संख्येने रोहिंग्यांना आश्रय दिला आहे. म्यानमारमधील लष्करी कारवाईमुळे या रोहिंग्यांना तेथून पळ काढावा लागला होता. या रोहिंग्यांना म्यानमारमधील रखाईन प्रांतात शाततेने परत पाठवायचे आहे. त्यासाठी भारताने सहकार्य करावे, अशी अपेक्षा चौधरी यांनी केली आहे.
रोहिंग्यांच्या घरवापसीबाबत म्यानमार आणि बांगलादेशमध्ये चर्चा झाली मात्र त्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही. रोहिंग्ये शांततेने, सुरक्षितपणे आणि स्थायी माघारी जावेत अशी भारताची अपेक्षा असल्याचे भारताने पूर्वी म्हटले होते.




