अमेरिका- पाकिस्तान सहकार्य वाढवणार! दहशतवादविरोधी कारवाईसाठी उच्चस्तरिय संवादानंतर निर्णय
इस्लामाबाद – दहशतवादी गटांविरोधातील कारवाईसाठी अमेरिका आणि पाकिस्तानने आपापसातील सहकार्याचे संबंध अधिक वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बलुच लिबरेशन आर्मी, इस्लामिक स्टेट-खोरसान आणि तालिबान या दहशतवादी गटांविरोधातल्या कारवाईसाठी अमेरिका पाकिस्तानला सहकार्य करणार आहे.
अमेरिकेने पाकस्थित बलुच लिबरेशन आर्मीला परदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केल्याच्या दुसऱ्या दिवशी दहशतवादविरोधाच्या सहकार्याच्या मुद्दयावर झालेल्या द्विपक्षीय चर्चेमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला. या संवादाचे सह-अध्यक्षपद पाकिस्तानचे संयुक्त राष्ट्रांचे विशेष सचिव नबील मुनीर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र विभागातील दहशतवादविरोधी कार्यवाहक समन्वयक ग्रेगरी डी. लोगेर्फो यांनी केले.
दोन्ही बाजूंनी सर्व प्रकारच्या आणि स्वरुपातील दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी एकमेकांना सहकार्य करण्याची वचनबद्धता व्यक्त केली असल्याचे बैठकीनंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनानुसार म्हटले आहे. दोन्ही प्रतिनिधींनी बलुचिस्तान लिबरेशन आर्मी, इसिस-खोरासान आणि तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान यांच्यासह दहशतवादी गटांच्या धोक्यांविरुद्ध प्रभावी कारवाई करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी आणि शांतता आणि स्थैर्य वाढविण्यासाठी शाश्वत आणि रचनाबद्ध सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे यावर दोन्ही बाजूंनी भर दिला. दहशतवादाविरोधात सातत्यपूर्ण कारवाई केल्याबद्दल अमेरिकेने पाकिस्तानचे कौतुक केले आहे.
बलुचिस्तानमधील घातपाती हल्ले, सुरक्षा दलांवरील हल्ले आणि जाफर एक्सप्रेसचे अपहरण करणाऱ्या बलुच लिबरेशन आर्मीला परदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले गेले आहे. या संघटनेला भारताचा पाठिंबा असल्याचा आरोप पाकिस्तानकडून केला जातो आहे.
अलिकडच्या काही महिन्यांत पाकिस्तान आणि अमेरिकेतील संबंधांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर अलिकडेच दोनवेळा अमेरिका भेटीवर गेले आहेत. त्यावेळी त्यांनी ट्रम्प यांच्याशी सहकार्याच्या मुद्दयावर संवाद साधला आहे.





