Pune: विकासासाठी सहकार हा एकमेव मार्ग

पुणे : नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत देशाला पूर्ण विकसित राष्ट्र करणे आणि २०२७ पर्यंत त्याच्या अर्थव्यवस्थेला ५ ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करणे हे दोन संकल्प राष्ट्राच्या समोर ठेवले आहेत. सहकारी क्षेत्राच्या योगदानाने दोन गोष्टी साध्य करता येऊ शकतात. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या क्षमतेनुसार काम देणे आणि प्रत्येक व्यक्तीला देशाच्या विकासाशी जोडणे, प्रत्येक कुटुंबाला समृद्ध करणे हे केवळ सहकारी चळवळीच्या माध्यमातून शक्य आहे. देशाच्या विकासात योगदान द्यायचे असेल, तर सहकार हा एकमेव मार्ग आहे, असे मत केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले.
जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे बँकेच्या अमृतमहोत्सवी वर्ष सांगता समारोहात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, बँकेचे अध्यक्ष रवींद्र हेजीब, उपाध्यक्ष अलका पेटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश कश्यप उपस्थित होते. जनता सहकारी बँकेच्या स्मरणिकेचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. अंब्रेला ऑर्गनायझेशनसाठी ५ कोटीचा धनादेश या वेळी बँकेच्या वतीने देण्यात आला.
शहा म्हणाले, की छोट्या लोकांची मोठी बँक, हा विश्वास जनता सहकारी बँकेने सार्थ केला आहे. देशातील पहिली को-ऑपरेटिव्ह डिमॅट संस्था बनण्याचा बहुमान बँकेने प्राप्त केला आहे. जनता बॅंकेच्या ठेवी ९६०० कोटींपेक्षा अधिक आहेत, हे बँकेचे यश आणि लोकांचा विश्वास आहे. सामाजिक कार्यात देखील बँक अग्रेसर आहे. कोणतीही संस्था जेव्हा सातत्यपूर्ण प्रगती करते, तेव्हा त्यांचे संस्थापक, संचालक, सदस्य हे तिघे सगळ्या उद्देशांना पूर्ण करतात. त्यामुळेच ही प्रगती शक्य असल्याचे गौरवोद्गार शहा यांनी या वेळी काढले.
अनेक आव्हानांना तोंड देत समर्थपणे आपल्या विचारांचा वारसा जपत अमृतमहोत्सवी वर्षामध्ये केलेल्या कामगिरीचे सिंहावलोकन करण्याचा हा सुवर्णक्षण आहे. बँकेवर काम करणारे भागधारक, निष्ठावान खातेदार, निःस्वार्थी संचालक आणि प्रामाणिक सेवक ही या बँकेची खरी शक्तिस्थाने असल्याचे रवींद्र हेजीब म्हणाले. जगदीश कश्यप यांनी स्वागत केले. रवींद्र हेजीब यांनी प्रास्ताविक केले. अलका पेटकर यांनी आभार मानले.





