भारत आणि अमेरिकेच्या संयुक्त कार्यगटाची बैठक; विमानवाहू जहाज तंत्रज्ञान सहकार्य विषयक चर्चा

नवी दिल्ली – भारत आणि अमेरिकेच्या विमानवाहू जहाज तंत्रज्ञान सहकार्य विषयक संयुक्त कार्यगटाची आठवी बैठक १३ ते १६ मे या कालावधीत भारतात झाली. हा संयुक्त कार्यगट भारत आणि अमेरिकेतील संरक्षण तंत्रज्ञान आणि व्यापार उपक्रमाअंतर्गत स्थापन करण्यात आला आहे.
या बैठकीसाठी अमेरिकेचे विमानवाहू जहाजांचे प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह ऑफिसर रिअर ॲडमिरल केसी मोटॉन यांच्या नेतृत्वाखाली सहा सदस्यांचे शिष्टमंडळ सहभागी झाले होते. या शिष्टमंडळाने भारताच्या दिल्ली आणि गोव्यामधील विविध संरक्षण संस्थांना भेट दिली.
भारताच्या विमानवाहू जहाज कार्यक्रमाचे सहाय्यक नियंत्रक रिअर ॲडमिरल विशाल बिश्नोई हे या उद्घाटनाच्या सत्राच्या सह अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत रिअर ॲडमिरल विशाल बिश्नोई आणि रिअर ॲडमिरल केसी मोटॉन यांनी संयुक्त कार्यगटाचे महत्त्व आणि गेल्या १० वर्षांतील प्रगतीचा आढावा घेतला.
दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी विमानवाहू जहाजांसंबंधी मौल्यवान माहितीच्या आदानप्रदानासाठी संयुक्त कार्यगटाने केलेल्या उल्लेखनीय कार्याची प्रशंसा केली. विमानवाहू जहाजविषयक तंत्रज्ञानाच्या विविध पैलूंच्या अनुषंगाने भविष्यातील परस्पर सहकार्याच्या नियोजनावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली.
या बैठकीच्या निमित्ताने गोव्यातील संरक्षण आस्थापनेत झालेल्या चर्चेत, भारतीय नौदलाच्या विमान वाहतूकविषयक तज्ज्ञांसोबत विमानवाहू जहाजांचे कामकाज आणि तंत्रज्ञानाशी संबंधित पैलूंवर व्यावसायिक पातळीवरील मुद्यांवर संवादात्मक देवाणघेवाण झाली.





