Bangladesh Cricketers BPL Boycott Threat : टी-२० विश्वचषक २०२६ या स्पर्धेतील सामन्यांच्या ठिकाणांवरून सुरू असलेला वाद आता बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) आणि खेळाडू यांच्यातील संघर्षात बदलला आहे. बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केलेल्या वादग्रस्त विधानानंतर संतापलेल्या बांगलादेशी खेळाडूंनी ‘बांगलादेश प्रीमियर लीग’ (BPL) सामन्यांवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली आहे. नेमका वाद काय? बीसीसीबीच्या वित्त समितीचे अध्यक्ष एम. नजमुल इस्लाम यांनी बांगलादेशचा माजी कर्णधार तमीम इक्बाल याला “भारतीय एजंट” म्हटल्याने हा वाद पेटला आहे. तमीमने विश्वचषकाच्या ठिकाणांबाबत सुरू असलेला पेच सोडवण्यासाठी आयसीसी (ICC) आणि बीसीसीआय (BCCI) यांच्याशी चर्चा करण्याचा सल्ला दिला होता. या सल्ल्यावर नजमुल इस्लाम यांनी ही टोकाची टिप्पणी केली. खेळाडू आक्रमक; बोर्डाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह – ‘क्रिकेटर्स वेलफेअर असोसिएशन ऑफ बांगलादेश’ने नजमुल इस्लाम यांचे विधान पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे. या विधानामुळे खेळाडूंच्या प्रतिष्ठेला धक्का लागला असून, जोपर्यंत राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत बीपीएलच्या सामन्यांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे. हेही वाचा – Henil Patel Bowling : कोण आहे हा हेनिल पटेल? ज्याच्या स्विंगसमोर अमेरिकेच्या निम्म्या संघाने टेकले गुडघे दुसरीकडे, नजमुल इस्लाम यांनी असेही म्हटले की, “जर बांगलादेशने टी-२० वर्ल्ड कपमध्ये सहभाग घेतला नाही, तर बोर्डाचे काहीही नुकसान होणार नाही. बांगलादेशचा संघ भारतात जाण्यास तयार नाही, त्यामुळे या स्पर्धेत खेळण्या-न खेळण्याने बोर्डाला कोणताही नफा किंवा तोटा होणार नाही.” बीसीबीकडून सारवासारव – वाढता वाद पाहून बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) बुधवारी संध्याकाळी अधिकृत पत्रक काढून नजमुल इस्लाम यांच्या विधानापासून स्वतःला दूर केले आहे. बोर्डाने सांगितले की, नजमुल इस्लाम यांचे विधान हे बोर्डाचे अधिकृत मत नाही. तसेच हे विधान बोर्डाची मूल्ये आणि तत्त्वांच्या विरोधात आहे.अशा प्रकारच्या आक्षेपार्ह विधानांबद्दल बोर्ड खेद व्यक्त करत आहे.” हेही वाचा – IND vs NZ : टीम इंडियाचा दारुण पराभव; डॅरिल मिचेलच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने मारली बाजी, केएल राहुलचं शतक व्यर्थ पाकिस्ताचीही एन्ट्री? या वादात आता पाकिस्तानचीही एन्ट्री झाल्याचे वृत्त असून, आयसीसी या संपूर्ण प्रकरणावर काय तोडगा काढणार याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे. बांगलादेश आणि भारत यांच्यातील क्रिकेट संबंधांमधील तणाव आता एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपला आहे.