IND vs NZ New Zealand beat India by 7 wickets : राजकोटचे मैदान भारतीय संघासाठी पुन्हा एकदा ‘अनलकी’ ठरले आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने केएल राहुलच्या नाबाद शतकाच्या जोरावर न्यूझीलंडसमोर २८५ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात पाहुण्या किवी संघाने डॅरिल मिचेलच्या शतकाच्या बळावर ७ गडी राखून सहज पूर्ण केले. या विजयासह न्यूझीलंडने ३ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. डॅरिल मिचेलचे वादळी शतक – न्यूझीलंडच्या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे डॅरिल मिचेल. २८५ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली होती. डेव्हॉन कॉनवे (१६) आणि हेन्री निकोल्स स्वस्तात बाद झाल्याने भारत सामन्यात पकड मिळवेल असे वाटले होते. मात्र, मिचेलने विल यंगसोबत तिसऱ्या विकेटसाठी १६२ धावांची अवाढव्य भागीदारी करत भारताच्या हातातील सामना हिसकावून घेतला. मिचेलने अवघ्या ९६ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. विशेष म्हणजे, भारताविरुद्धच्या गेल्या ४ वनडे डावांतले हे त्याचे तिसरे शतक आहे. भारतीय गोलंदाज ठरले ‘फ्लॉप’ – भारताच्या पराभवाचे मुख्य कारण गोलंदाजांची सुमार कामगिरी ठरली. मधल्या षटकांमध्ये फिरकीपटू कुलदीप यादव कमालीचा महागडा ठरला; त्याने १० षटकांत ८२ धावा खर्च केल्या. मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा आणि प्रसिद्ध कृष्णा यांनाही मिचेल आणि यंग जोडीला रोखण्यात अपयश आले. विल यंगने ८७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत विजयात मोलाचे योगदान दिले. हेही वाचा – Meg Lanning Record : मेग लॅनिंगचा ऐतिहासिक पराक्रम! डब्ल्यूपीएलमध्ये ‘ही’ कामगिरी करणारी ठरली तिसरी फलंदाज केएल राहुलची शतकी खेळी ठरली व्यर्थ – याआधी भारताकडून केएल राहुलने ८७ चेंडूत शानदार ११२ धावांचे शतक झळकावले होते. कठीण परिस्थितीत त्याने डाव सावरला, मात्र त्याच्या या झुंजार खेळीवर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी पाणी फेरले. भारताचे २८४ धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने दमदार फलंदाजीचा नमुना सादर करत पार केले. हेही वाचा – Rohit Sharma Record : रोहित शर्माचा आशियात ‘विराट’ पराक्रम! ‘या’ दिग्गज खेळाडूंच्या यादीत पटकावलं स्थान मालिकेतील निर्णायक सामना इंदूरमध्ये होणार – भारत-न्यूझीलंडने प्रत्येकी एक सामना जिंकल्याने मालिका आता १-१ अशा बरोबरीत आहे. त्यामुळे आता मालिकेचा निर्णय १८ जानेवारी रोजी इंदूरमध्ये होणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात होईल.