Zagreb Open 2024 Wrestling : क्रोएशियातील स्पर्धेतून बंजरंगची माघार, समोर आलं ‘हे’ कारण…

नवी दिल्ली – सरावाला अद्याप सुरुवात केली नसल्याने थेट स्पर्धेत सहभागी होणे शक्य नसल्याचे सांगत भारताचा ऑलिम्पियन कुस्तीपटू बजरंग पुनिया याने क्रोएशियात होत असलेल्या Zagreb Open कुस्ती स्पर्धेतून माघार घेतली आहे. अर्थात भारतीय कुस्ती महासंघाविरोधात बजरंगसह अनेक महिला व पुरुष कुस्तीपटूंनी केलेल्या आंदोलनानंतर झालेल्या निवडणूकीतही पक्षपात झाल्यामुळेच बजरंगसह काही खेळाडू असा निर्णय घेत असल्याचे सांगिले जात आहे.
येत्या १० ते १४ जानेवारी या कालावधीत ही स्पर्धा क्रोएशियात होत आहे. पुनिया याच्यासह महिला कुस्तीपटू अंतिम पघलनेही वैयक्तीक कारणाने माघार घेतली आहे. भारतीय ऑलिंपिक समितीकडून नियुक्त करण्यात आलेल्या हंगामी समितीकडून ही निवड करण्यात आली असून तीन सदस्यीय समितीचे प्रमुख म्हणून भूपिंदर सिंह बाजवा हे काम करत आहेत.
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून सुचना आल्यावर लगेचच या स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. खेळाडूंच्या व्हीसाचा प्रश्नही लवकर सुटला असून या स्पर्धेत सहभागी होत असलेल्या भारतीय खेळाडूंना आशियाई स्पर्धेची पात्रता फेरी व जागतिक स्पर्धेची पात्रता फेरी यासाठी तयारी करता येणार आहे.





