Bajrang Punia । Vinesh Phogat : हरियाणातून ‘विनेश फोगाट’चा दणदणीत विजय ! बजरंग पुनिया म्हणाला, “हा लढा देशातील…’

Bajrang Punia । Vinesh Phogat । Election Result 2024 : हरियाणाच्या जुलाना मतदार संघातून कुस्तीपटू विनेश फोगाटचा विजय झाला आहे. भाजपच्या योगेश बैरागी यांच्यावर मात करत विनेश फोगाट यांनी विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे.
विनेश फोगट यांना एकूण 65,080 मते मिळाली, तर योगेश बैरागी यांना 59,065 मते मिळाली. याशिवाय सुरेंद्र लाथेर यांना 10,158 मते मिळाली. अशा प्रकारे विनेश फोगट 6015 मतांनी विजयी झाल्या आहेत.
दरम्यान, विनेशच्या या विजयानंतर कुस्तीपटू बजरंग पुनिया यानेही प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट करत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
देश की बेटी विनेश फोगाट को जीत की बहुत बहुत बधाई।
यह लड़ाई सिर्फ़ एक जुलाना सीट की नहीं थी, सिर्फ़ 3-4 और प्रत्याशियों के साथ नहीं थी, सिर्फ़ पार्टियों की लड़ाई नहीं थी।
यह लड़ाई देश की सबसे मज़बूत दमनकारी शक्तियों के ख़िलाफ़ थी। और विनेश इसमें विजेता रही।#VineshPhogat… pic.twitter.com/dGR5m2K2ao
— Bajrang Punia 🇮🇳 (@BajrangPunia) October 8, 2024
कुस्तीपटू बजरंग पुनिया म्हणाला, “देशाची मुलगी विनेश फोगाट हीचं विजयासाठी फार फार अभिनंदन… हा लढा फक्त जुलाना मतदारसंघापुरता नव्हता, 3-4 उमेदवारांविरोधात नव्हता, तसेच फक्त पक्षांविरोधातही नव्हता. हा लढा देशातील सर्वात बलाढ्य जुलमी शक्तींविरुद्ध होता आणि विनेश यात विजेती ठरली”, असं बजरंगने म्हटलंय.
विनेश फोगाटचा काँग्रेसमध्ये प्रवेश :
विनेश फोगाट यावर्षी पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर पडल्यानंतर भारतात परतल्यानंतर तिने 6 सप्टेंबर रोजी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात बजरंग पुनियासह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर काँग्रेसने हरियाणाच्या जुलाना विधानसभा मतदारसंघातून विनेशला उमेदवारी दिली होती.
कुस्तीपटू विनेश फोगाट 2024 ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जात होती. मात्र 100 ग्रॅम अधिक वजनामुळे तिचे फायनलचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.
बजरंग पुनिया आणि साक्षी मलिकसह विनेश आंदोलनात :
भारतीय कुस्ती संघटनेचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करत विनेश फोगट 2023 मध्ये दिल्लीच्या रस्त्यावर उतरली होती. या आंदोलनात बजरंग पुनिया आणि साक्षी मलिकही त्यांच्यासोबत होते. त्या काळात या पैलवानांना काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा मिळाला.
जुलाना मतदारसंघातील मागील विधानसभा निवडणूक :
जुलाना मतदारसंघात गेल्या विधानसभा निवडणुकीत जननायक जनता पक्षाचे अमरजीत दंडा यांना 61,942 मते मिळाली होती. त्यांनी भाजपच्या परमिंदर सिंग धुल यांचा पराभव केला. परमिंदर सिंग यांना 37,749 मते मिळाली. काँग्रेसचे धर्मेंद्र सिंह धुल यांना 12,440 मतांवर समाधान मानावे लागले.
2014 च्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस उमेदवाराला 23 हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. 2009 च्या निवडणुकीतही काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले होते. विनेश निवडणुकीच्या रिंगणात असल्याने सर्वांच्या नजरा या हायप्रोफाईल जागेवर लागल्या होत्या.





