नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार बृजभूषण सिंह यांना लैंगिक छळाच्या प्रकरणात दिलासा मिळाल्याबद्दल कुस्तीगीर आणि काँग्रेस नेता बजरंग पुनिया याने यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बृजभूषण सिंह रोड शो करत आहेत आणि पोक्सो कायद्यातून निर्दोष सुटल्यानंतर त्यांचा विजय झाला असल्याचे दाखवत आहेत. मात्र त्यांच्या विरोधात ६ महिला कुस्तीगीरांचे खटले अजूनही न्यायालयात सुरू आहेत असे पुनियाने म्हटले आहे. जेव्हा महिला कुस्तीगीर निदर्शने करत होत्या, त्याच वेळी अल्पवयीन महिला कुस्तीगीराने बृजभूषणच्या दबावाखाली माघार घेतली, वास्तविक तिने एकदा बृजभूषणविरुद्ध साक्ष दिली होती. ब्रिजभूषण अजूनही उर्वरित ६ महिला कुस्तीगीरांवर त्यांचे खटले मागे घेण्यासाठी सतत दबाव आणत आहेत. लैंगिक छळाच्या पीडितांना झुकवण्यासाठी आणि पुन्हा रोड शो आयोजित करून त्यांना आपली ताकद दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. आजही गुंडांसमोर कायदा कमकुवत असल्याचे अनेक वेळा दिसते अशी टिप्पणी बजरंग पुनिया याने केली आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर अनेक महिला कुस्तीगीरांनी लैंगिक छळाचा आरोप केला होता, ज्यात एका अल्पवयीन मुलीचाही समावेश होता. तथापि, अल्पवयीन कुस्तीगीराने नंतर सांगितले की तिने दबावाखाली सिंग यांच्यावर आरोप केले. पोलिसांनी या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला. सोमवारी (२६ मे) न्यायालयाने हा अहवाल स्वीकारला असल्यामुळे या एका प्रकरणातून त्यांची सुटका झाली आहे. अनुभवी कुस्तीगीर साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी लैंगिक छळाच्या प्रकरणांवरून ब्रिजभूषण सिंग यांच्याविरुद्ध निषेध केला होता व यामुळे त्यांना अथवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला महासंघाची निवडणूक लढवता आली नव्हती. एवढेच नव्हे तर बृजभूषण सिंह यांचे लोकसभेचे तिकिटही कापले गेले होते.