लाहोर :- भारतात होत असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी तयारी सुरू असताना पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम नव्या वादात अडकला होता. सरावाला जात असताना बाबरने कार चालवत असताना वाहतूक नियमाचे उल्लंघन केले. त्याबद्दल त्याला दंडही करण्यात आला. त्याने हा दंड भरला व त्याची पावतीही घेतली. मात्र, तरीही आता त्याच्यावर टीका होतच आहे.
मुळातच एका देशाच्या संघाचे नेतृत्व करत असलेल्या खेळाडूकडून वाहतूक नियमांचे पालन होणे गरजेचे आहे, असे त्याच्यावर चाहत्यांनी टीका करताना म्हटले आहे. ठरवून दिलेल्या नियमापेक्षा जास्त वेगाने कार चालवल्याबद्दल बाबरला हा दंड ठोठावण्यात आला, अशी माहिती स्थानिक वाहतूक पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान,यंदाची स्पर्धा भारतात येत्या 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. येत्या 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरदरम्यान सराव लढती होतील.
विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी पाकचा संघ गुरुवारी भारतात दाखल होणार आहे.