नवी दिल्ली – एकीकडे शिवसेना आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुनावणी सुरू असताना दुसरीकडे ठाकरे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून केला जात आहे.
ठाकरे गटाच्या 4 खासदारांना शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्याकडून नोटीस पाठवण्यात येणार आहे. शिंदे गटाने एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
नुकतेच संसदेचे विशेष अधिवेशन झाले. यात महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले. यासाठी संसदेत मतदानही घेण्यात आले. मात्र, मतदानाच्या दिवशी ठाकरे गटाचे चार खासदार अनुपस्थित होते.
मात्र, गैरहजेरीबाबत त्यांनी कोणताही निर्णय लोकसभा सचिवालयाला कळविला नसल्याचे सांगितले जात आहे. याच मुद्द्यावरुन शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या खासदारांना कोंडीत पकडण्याची तयारी सुरू असल्याचे दिसत आहे.
अधिवेशनात उपस्थित राहण्याबाबत शिंदे गटाकडून व्हिप बजावण्यात आला होता. हा व्हीप नाकारल्याने शिंदे गटाच्या प्रतोद भावना गवळी यांच्याकडून ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत, राजन विचारे, संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर या खासदारांना नोटीस पाठवण्यात येणार आहे.
भावना गवळी यांनी 14 सप्टेंबर रोजी व्हीप काढला होता. महिला आरक्षण विधेयकाच्या बाजूने शिवसेना खासदारांनी मतदान करावे, असे आदेश भावना गवळी यांनी व्हीपद्वारे दिले होते.
परंतू या विशेष अधिवेशनातच ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत, राजन विचारे, ओमप्रकाश निंबाळकर, संजय जाधव हे हजर राहिले नसल्यामुळे त्यांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केलेले नाही.