Baba Siddique : “मोठे होर्डिंग्ज लावतात पण जबाबदारी घेत नाहीत…”; उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना झापलं, काय म्हणाले? पाहा….

Baba Siddique | Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठे नाव बाबा सिद्दीकी यांची मुंबईतील वांद्रे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गोळीबार करणाऱ्यांनी त्याच्यावर तीन राऊंड गोळीबार केला, त्यानंतर लीलावती रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की, बाबा सिद्दीकी यांना रात्री 9: 30 वाजता येथे आणण्यात आले.
त्यांना येथे आणताच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले परंतु त्यांच्या हृदयाचे ठोके जात नव्हते, त्यानंतर आमच्याकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले आणि 11: 27 च्या सुमारास बाबा सिद्दीकी यांचे निधन झाले.
डॉक्टरांनी सांगितले की, त्यांना दोन गोळ्या लागल्या, त्यापैकी एक त्याच्या छातीत लागली. या घटनेनंतर सर्व स्तरातून दुःख व्यक्त केलं जात आहे. त्यांच्या हत्येनंतर राजकीय नेत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
मात्र, अश्यातच आता उद्धव ठाकरे यांनी देखील महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “गृहमंत्री मोठे होर्डिंग्ज लावतात पण जबाबदारी घेत नाहीत. महाराष्ट्राच्या जनतेशी गद्दारी झाली आहे. जनतेसह नेतेही असुरक्षित आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
भ्रष्टाचारी सरकारविरोधातील आरोपपत्र घेऊन आम्ही जनतेच्या न्यायलयात जाणार आहोत. हे सरकार केवळ जाहिरातबाजीवर पैसे खर्च करतंय. जाहिरातबाजीऐवजी जनतेच्या सुरक्षेवर पैसे खर्च करा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
पोलिसांचा उपयोग या गद्दारांच्या सुरक्षेसाठी केला जातो. सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी किती पोलीस आहेत? गद्दारी करुन आलेल्यांना आणि त्यांच्या घरच्यांना किती सुरक्षा आहे? असा प्रश्न त्यांनी विचारला.
2 ते 3 दिवसात निवडणुकीची घोषणा होऊ शकते. सरकार एका मागोमाग एक निर्णय घेतंय. पण अमंलबजावणी कशी होणार? हे सांगत नाही. महाराष्ट्रात जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जातोय, अशी टीकाही त्यांनी केली.





