नवी दिल्ली- विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यानिमित्त ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स भारतात आले होते. क्रिकेटच्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करून कोट्यवधी भारतीयांचा आनंद हिरावून घेतला असला तरी भारतात आलेल्या मार्ल्स यांना वेगळा डिजिटल भारत पाहायला मिळाल्यामुळे तेही चकित झाल्याशिवाय राहीले नाहीत.
त्याचे झाले असे की क्रिकेटची फायनल मॅच झाल्यानंतर मार्ल्स दिल्लीला परतले. तेथे त्यांनी भारतीय व्यंजनांवर ताव मारलाच मात्र त्याचवेळी डिजिटल इंडियाचे दर्शनही त्यांना झाले. मार्ल्स यांनी येथील एका ठेल्यावर लिंबू सरबत घेतले. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या अधिकाऱ्याने सरबत विक्री करणाऱ्या स्कॅन करून पैसे ट्रान्सफर केले. एखाद्या उच्चशिक्षित व्यक्तीने अशा प्रकारे पैसे अदा करणे ही विशेष बाब नाही.
मात्र ज्या ठेलेवाल्याने ते पैसे त्या पध्दतीने स्विकारले आणि विशेष म्हणजे त्याच्याकडे तशी सुविधा होती व त्याला त्याचे पूर्ण ज्ञानही असल्याचे पाहुन मार्ल्स प्रभावित झाले. त्यांचा हा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अर्थात मार्ल्स यांनी जरी हे कदाचित पहिल्यांदाच पाहिले असले तरी भारतात अगदी भाजीविक्रेत्यांपासून पानाच्या दुकानापर्यंत हल्ली अशाच प्रकारचे डिजिटल व्यवहार सगळीकडे होत आहेत व ते लोकांच्या अंगवळणीही पडले असून आर्थिक साक्षर नसलेली मंडळीही या व्यवहारांना तरबेज झाली असल्याचे पाहुन मार्ल्स चकित झाले नसतेल तरच नवल होते.
दरम्यान, मार्ल्स एका मिठाईच्या दुकानात लाडू खात असतानाचा व्हिडिओही व्हायरल झाला असून त्या लाडवाची चव त्यांना चांगलीच भावल्याचे त्यांच्या हावभावांवरून समजते आहे.