Australia vs Pakistan T20 Series Result : पाकिस्तानचा संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. जिथे पाकिस्तानने एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाला 2-1 ने हरवून इतिहास रचला होता. त्यानंतर आता दोन्ही संघांमध्ये 14 ते 18 नोव्हेंबर दरम्यान टी-20 मालिका खेळवली गेली. यामध्ये ऑस्ट्रेलियाने तिन्ही टी-20 सामने जिंकत पाकिस्तानला व्हाईटवॉश देत वनडे मालिकेतील आपल्या पराभवाचा वचपा काढला आहे.
तिसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव करताना तीन टी-20 सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली आहे. तिसरा सामना होबार्टमध्ये खेळला गेला, ज्यामध्ये पाकिस्तान संघ प्रथम खेळताना निर्धारित षटकात 117 धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 11.2 षटकात अवघ्या तीन विकेट्सच्या मोबदल्यात 118 धावा करत लक्ष्य गाठले. ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टॉयनिस हा सामन्याचा तर स्पेन्सर जॉन्सन हा मालिकेचा मानकरी ठरला.
Australia are victorious in the third T20I by 7 wickets. #AUSvPAK pic.twitter.com/Ub1p9SEfwI
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 18, 2024
असा झाला सामना….
तिसऱ्या टी-20 सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र कर्णधार आगा सलमानचा हा निर्णय चूकीचा ठरला. प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानची सुरुवात खूपच खराब झाली. दुसऱ्याच षटकात संघाला पहिला धक्का बसला. साहिबजादा फरहान 7 चेंडूत 9 धावा करून माघारी परतला. त्यानंतर बाबर आझम आणि हसीबुल्लाह खान यांनी काही वेळ डाव सावरला आणि दुसऱ्या विकेटसाठी 44 धावा जोडल्या. हासीबुल्लाह खान 24 धावा करून बाद झाला आणि पाकच्या फलंदाजीला गळती लागली. उस्मान खान (03) आणि आगा सलमान (01) स्वस्तात बाद झाले.
त्यानंतर बाबर आझमकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती मात्र तोही 12.3 षटकात तंबूत परतला. त्यानं 28 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 41 धावा केल्या. त्यानंतर इरफान खान 10, अब्बास आफ्रिदी 1, जहाँदाद खान 5, शाहीन आफ्रिदी 16, सुफियान मुकीम 1 धाव करून बाद झाले. सात फलंदाजांना दुहेरी धावसंख्येचा आकडा गाठता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत अरॉन हार्डीने 4 षटकात 21 धावा देत सर्वाधिक 3 विकेट घेतल्या तर एडम झाम्पा आणि स्पेन्सर जॉन्सन यांनी प्रत्येकी 2 आणि झेव्हियर बार्टलेट आणि नाथन एलिसने प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरात विजयासाठी 118 धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियाने 3 गडी गमवून 11.2 षटकातमध्ये पूर्ण केलं. सुरुवातील काही धक्के बसल्यानंतर मार्कस स्टोयनिसनं झंझावाती खेळी करून संघाला दणदणीत विजय मिळवून देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली. ऑस्ट्रेलियाची सुरुवात काही खास नव्हती. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कांगारू संघाला पहिला तर चौथ्या षटकात 30 धावसंख्येवर ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का बसला. यामध्ये मॅथ्यू शॉर्ट 2 आणि जेक फ्रेझर मॅकगर्क 18 धावा करून माघारी परतले. त्यानंतर संघाच्या 85 धावसंख्येवर जोश इंग्लिस 24 चेंडूत 27 धावा करून माघारी परतला.
सुरुवातीला काही धक्के बसल्यानंतर मार्कस स्टॉयनिसने संघाची धूरा हाती घेतली आणि 27 चेंडूत 5 षटकार आणि 5 चौकाराच्या मदतीने नाबाद 61 धावांची झंझावती खेळी करत विजयावर शिक्कामोर्तब केलं तर टीम डेव्हिड 3 चेंडूत 7 धावा काढत नाबाद राहिला. पाकिस्तानकडून शाहीन अफ्रिदी, जहाँदाद खान आणि अब्बास अफ्रिदी यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. या व्यतिरिक्त इतर गोलंदाजांना काहीच खास करता आलं नाही परिणामी सामना गमवावा लागला.
टी-20 मध्ये पाकिस्तानची अवस्था वाईट…
टी-20 फॉरमॅटमध्ये पाकिस्तान संघाची स्थिती सध्या खूपच खराब आहे. गेल्या 9 टी-20 मालिकेत पाकिस्तान संघाला केवळ एकाच वेळी मालिका विजय मिळवता आला आहे तर 6 वेळा पराभव स्विकारावा लागला आहे आणि दोन वेळा मालिका अनिर्णित राहिली आहे. यामध्ये अफगाणिस्ताननेही टी-20 मालिकेत पाकिस्तानचा पराभव केला आहे.