AUS vs PAK 2nd T20 : बाबर-रिझवान पुन्हा फ्लॉप…! ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या दुसऱ्या T20 सामन्यातही पाकिस्तान पराभूत…

AUS vs PAK 2nd T20 Match Result : पाकिस्तानचा संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. जिथे पाकिस्तानने एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाला हरवून इतिहास रचला होता. त्यामुळे आता दोन्ही संघांमध्ये तीन सामन्याची टी-20 मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील दुसरा सामना सिडनी येथे खेळला गेला. या सामन्यातही ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 13 धावांनी पराभव करत विजय साकारला आहे. यासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. मालिकेतील पुढील सामना सोमवारी (19 नोव्हेंबर) रोजी खेळवला जाईल.
Spencer Johnson picks up 5️⃣wickets as Australia take an unassailable 2-0 series lead against Pakistan 🔥#AUSvPAK: https://t.co/AFJIFQbgnM pic.twitter.com/moWyWQp4To
— ICC (@ICC) November 16, 2024
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं होते त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आॅस्ट्रेलियानं 20 षटकात 9 गडी गमावून 147 धावा करत पाकिस्तानसमोर विजयासाठी 148 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव 19.4 षटकात 134 धावांवरच आटोपला. मालिकेतील पाकिस्तानचा हा सलग दुसरा पराभव ठरला. या सामन्यात स्पेन्सर जॉन्सनने ऑस्ट्रेलियासाठी घातक गोलंदाजी करत 5 विकेट घेत पाकिस्तानचे कंबरडे मोडले आणि विजयाचा नायकही ठरला. त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
विजयासाठी 148 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचे फलंदाज पुन्हा एकदा अपयशी ठरले. पाकिस्तानचा संघ केवळ 134 धावांवर गडगडला. पाकिस्तानकडून उस्मान खानने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 38 चेंडूत 52 धावा केल्या. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 1 षटकार लगावला. त्याच्याशिवाय इरफान खानने 28 चेंडूत 37 धावा तर कर्णधार रिझवान 26 चेंडूत 16 धावा करून माघारी परतला. या तीन फलंदाजाशिवाय इतर एकालाही दुहेरी धावसंख्येचा आकडा गाठता आला नाही. बाबर रिझवानसोबत सलामीला आला होता, पण त्याचा खराब फॉर्म कायम राहिला आणि तो 3 धावा करून बाद झाला तर आगा सलमान, शाहीन अफरीदी नसीम शाह आणि सुफियान मुकीम हे शून्यावर माघारी परतले. या सामन्यात स्पेन्सर जॉन्सनने 4 षटकात 26 धावा देऊन 5 विकेट घेतल्या आणि या संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाज देखील ठरला. त्याच्याशिवाय ॲडम झाम्पाने 4 षटकात 19 धावा देत 2 बळी घेतले.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 9 गडी गमावून 147 धावा केल्या. मॅथ्यू शॉर्ट आणि जेक फ्रेझर-मॅकगर्क यांनी ऑस्ट्रेलियाला स्फोटक सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 3.4 षटकात 52 धावा जोडल्या. यादरम्यान हॅरिस रौफने जेक फ्रेझर-मॅकगर्कला 20 धावांवर बाद केले. यानंतर कर्णधार जोश इंग्लिस खाते न उघडता बाद झाला. तो बाद झाल्यानंतर मॅथ्यू शॉर्टही 32 धावा करून बाद झाला. यानंतर ऑस्ट्रेलियाने ठराविक अंतरावर (मार्कस स्टॉइनिस 14, ग्लेन मॅक्सवेल 18, टिम डेव्हिड 18, झेवियर बार्टलेट 05, आरोन हार्डी 28, स्पेन्सर जॉन्सन 0) विकेट गमावल्या. पाकिस्तानकडून हारिस रौफने 4 षटकात 22 धावा देत 4 बळी तर अब्बास आफ्रिदीने 4 षटकात 17 धावा देत 3 बळी घेतले. याशिवाय सुफियान मुकीमने 2 बळी घेतले.





