AUS vs PAK 1st T20 Match Result : पाकिस्तानचा संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. जिथे पाकिस्तानने एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाला हरवून इतिहास रचला होता. त्यामुळे आता दोन्ही संघांमध्ये टी-20 मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिल्याच सामन्यात मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानच्या संघानं कांगारूच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्कारली. वास्तविक, ऑस्ट्रेलियाने पहिला T20 सामना 29 धावांनी सहज जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
पावसामुळे दोघांमधील पहिला टी-20 सामना प्रत्येकी 7 षटकांचा झाला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने 7 षटकांत 4 गडी गमावून 93 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाला 7 षटकात 9 बाद 64 धावाच करता आल्या. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाने 29 धावांनी सहज विजय मिळवला. आता या मालिकेतील दुसरा सामना 16 नोव्हेंबरला सिडनी क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे.
Australia win the first T20I by 29 runs.#AUSvPAK pic.twitter.com/x1gKNYdmZW
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 14, 2024
ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने 19 चेंडूत सर्वाधिक 43 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 3 षटकार मारले. याशिवाय मार्कस स्टॉइनिसने 7 चेंडूत नाबाद 21 धावांचे योगदान दिले. पाकिस्तानसाठी अब्बास आफ्रिदी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. अब्बास आफ्रिदीने एका षटकात 9 धावा देत 2 बळी घेतले. याशिवाय नसीम शाह आणि हरिस रौफ यांना प्रत्येकी 1 यश मिळाले. नसीम 2 षटकात 37 तर हरिसनं 2 षटकात 21 धावा खर्च केल्या.
ऑस्ट्रेलियाच्या 93 धावांच्या प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहान 8 धावा करून बाद झाला. तर पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान एकही धाव न काढता माघारी परतला. बाबर आझमला केवळ 3 तर उसामा खानला 4 धावा करता आल्या. पाकिस्तानचे 6 फलंदाज 24 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. इतर फलंदाजामध्ये अब्बास आफ्रिदीने 10 चेंडूत नाबाद 20 धावा, हसीबुल्लाह खाननं 8 चेंडूत 12 तर शाहीन अफरीदीने 6 चेंडूत 11 धावा केल्या असल्या तरी पाकिस्तानसाठी ते अपुरे ठरले. पाकिस्तानचे फलंदाज वाईटरित्या फ्लॉप ठरले. याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, संघाचे 7 फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले नाहीत.
ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत नॅथन एलिस आणि झेवियर बार्टलेट हे सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले. नॅथन एलिस आणि झेवियर बार्टलेटने प्रत्येकी 3-3 बळी घेतले. याशिवाय ॲडम झाम्पाला 2 यश मिळाले तर स्पेन्सर जॉन्सनने 1 बळी घेतला.