Babar Azam : बाबर आझमने मोडला विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! टी-२० क्रिकेटमध्ये प्रस्थापित केला नवा जागतिक विक्रम
Babar Azam : बाबर आझमने विराट कोहलीचा अर्धशतकाचा विश्वविक्रम मोडला आहे.

Babar Azam broke Virat Kohli record : पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमने आपल्या खराब फॉर्मवर टीका करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी-२० सामन्यात बाबरने अर्धशतक झळकावत टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीचा एक मोठा जागतिक विक्रम मोडीत काढला आहे. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने फलंदाजीची जबरदस्त मेजवानी दिली.
बाबरने मोडला विराट कोहलीचा रेकॉर्ड –
बाबर आझमने या सामन्यात ३६ चेंडूत ५० धावांची खेळी केली. हे त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ३९ वे अर्धशतक ठरले. यासह तो टी-२० फॉरमॅटमध्ये सर्वाधिक अर्धशतके ठोकणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे.
Babar Azam has completed 4500 runs in T20Is. No one is even close to him.#BabarAzam𓃵|#BabarAzam pic.twitter.com/GfdlkWXLw0
— BxBverse (@bxbverse_) February 1, 2026
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकं –
- बाबर आझम: ३९ अर्धशतके (१३९ सामने)
- विराट कोहली: ३८ अर्धशतके (१२५ सामने)
- रोहित शर्मा: ३२ अर्धशतके (तिसरे स्थान)
स्ट्राइक रेटवर पुन्हा प्रश्नचिन्ह?
बाबर आझमने ३६ चेंडूंत ५० धावा केल्या, ज्यात ३ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. मात्र, त्याचा १३८.८८ चा स्ट्राइक रेट पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. पाकिस्तानने २०० पेक्षा जास्त धावा केलेल्या सामन्यांमध्ये हे तिसरे सर्वात संथ अर्धशतक ठरले आहे. मालिकेत पहिल्या दोन सामन्यांत अपयशी ठरल्यानंतर (२ आणि २४ धावा), बाबरला या खेळीमुळे दिलासा मिळाला असला तरी वेगाने धावा करण्याबाबत त्याच्यावर टीका होत आहे.
सैम अयुब आणि शादाब खानचा धडाका –
बाबर आझमने विराट कोहलीचा विश्वविक्रम मोडला
बाबर आझम व्यतिरिक्त पाकिस्तानच्या इतर फलंदाजांनीही ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घेतला. सैम अयुबने ३७ चेंडूंत ५६ धावांची शानदार खेळी केली. त्याचबरोबर शादाब खानने अवघ्या १९ चेंडूंत ४६ धावा ठोकल्या (२ चौकार, ५ षटकार). या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने २० षटकांत ६ बाद २०७ धावांचा डोंगर उभा केला. पाकिस्तानने ही मालिका आधीच जिंकली असून, तिसऱ्या सामन्यातही त्यांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे.





