PAK vs AUS : इस्लामाबाद बॉम्बस्फोटानंतर ऑस्ट्रेलिया सतर्क! लाहोरमध्ये सुरक्षा तपासणी सुरू

कांगारू संघाचे वेळापत्रक –
ऑस्ट्रेलियाचा संघ पुढील वर्षाच्या सुरुवातीला पाकिस्तानचा दौरा करणार आहे. या दौऱ्याची सुरुवात ३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांनी होईल आणि त्यानंतर ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाईल. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) अद्याप टी-२० सामन्यांच्या ठिकाणांची औपचारिक घोषणा केली नसली तरी, हे तिन्ही सामने लाहोरमध्येच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पीसीबी अध्यक्षांशी चर्चा –
ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळात एक स्वतंत्र सुरक्षा सल्लागार, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनचा एक प्रतिनिधी आणि ऑस्ट्रेलियन उच्चायुक्तालयाचे अधिकारी यांचा समावेश आहे. या भेटीदरम्यान त्यांनी पीसीबीचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांच्याशी सुरक्षा प्रोटोकॉल, लॉजिस्टिक्स आणि दौऱ्यासाठीच्या धोक्यांचे व्यवस्थापन यावर चर्चा केली आहे.
हेही वाचा – Blair Tickner : धक्कादायक! न्यूझीलंडच्या खेळाडूला गंभीर दुखापत, क्षेत्ररक्षण करताना खांदाच निखळला
इस्लामाबाद स्फोटामुळे चिंता –
इस्लामाबादमध्ये कोर्टाच्या आवारात झालेल्या बॉम्बस्फोटात १२ लोकांचा मृत्यू झाला आणि २५ हून अधिक लोक जखमी झाले होते. या हल्ल्यामुळे पाकिस्तानमधील सुरक्षा वातावरणाबाबत नवीन चिंता निर्माण झाल्या आहेत. या स्फोटावेळी श्रीलंकेचा संघ इस्लामाबाद शहरातच उपस्थित होता. या घटनेमुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ निश्चितच अधिक सतर्क झाला आहे.
सुरक्षा व्यवस्थेची पाहणी –
ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळाच्या भेटीमध्ये गद्दाफी स्टेडियम आणि एलसीसीए ग्राउंडची कसून पाहणी करण्यासोबतच टीमचे हॉटेल आणि ये-जा करण्याच्या मार्गांचेही निरीक्षण समाविष्ट आहे. ते आपली मूल्यांकन अहवाल क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे सादर करण्यापूर्वी पीसीबी अधिकारी आणि पाकिस्तानच्या सुरक्षा एजन्सींसोबत आणखी बैठका घेण्याची शक्यता आहे.
अहवालानंतर अंतिम निर्णय –
क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून अपेक्षा आहे की, हे सुरक्षा शिष्टमंडळ पुढील काही आठवड्यांमध्ये आपला अहवाल सादर करेल आणि त्यानंतरच जानेवारीतील दौऱ्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.





