राहुरी,– राहुरी स्टेशन येथे मध्यरात्री तीन मोटरसायकलवर तोंडाला रुमाल बांधून आलेल्या सात जणांच्या टोळक्याने येथील निसार सय्यद यांच्या घरावर हल्ला केला. त्यावेळी टोळक्याने घरासमोरील वाहनांची तोडफोड केली. दोन चारचाकी वाहन पेट्रोल टाकून पेटवून दिले. पेट्रोल फुगे घरात टाकून घर पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सय्यद निसार 35 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्राशी संबंधित आहेत. मोटरसायकलवर आलेल्या सात जणांनी सय्यद निसार यांच्या घरावर हातात दांडे घेऊन हल्ला केला. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
दोन दिवसांपूर्वी पत्रकार निसार सय्यद यांच्या कुटुंबातील अतीक मुख्तार सय्यद या तरुणावर अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी राहुरी पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस पथकाने घटनेतील आरोपीला अटक केली आहे. त्यामुळे या दोन्ही घटनेचा संबंध आहे काय? याचा तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान, आज तालुक्यातील अनेक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार निसार सय्यद यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी आरपीआय आठवले गटाचे तालुकाध्यक्ष विलास साळवे यांनी सय्यद कुटुंबीयांची भेट घेऊन हा हल्ला अतिशय निंदनीय असल्याचे सांगितले. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात जातीय तेढ निर्माण करण्याचे काम काही संघटनांकडून चालू आहे. याबाबत आरपीआयच्या वतीने लवकरच तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा साळवे यांनी दिला. घरावर झालेल्या हल्ल्यांबाबत पत्रकार निसार सय्यद यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
हल्लेखोरांचा तपास करणार
कालच्या गुन्ह्यातील आरोपी आतिक सय्यद व पत्रकार सय्यद निसार हे स्टेशन परिसरात शेजारी राहतात. कालच्या गुन्ह्याचा व पत्रकार सय्यद निसार यांचेवरील हल्ल्याचा संबंध पोलीस अधिक बारकाईने तपास करीत आहेत. हल्लेखोरांपर्यत यंत्रणा नक्कीच पोहोचेल.