Ashadhi Wari Security: वारीमध्ये हायटेक सुरक्षा! ३ हजार कॅमेरे अन् ड्रोनच्या नजरेतून गुन्हेगारांवर वॉच; पाहा एआय कमाल
Ashadhi Wari Security: पुणे पोलिसांच्या आयटी विभागाचे एसीपी विवेक पवार यांच्याकडे डिजिटल सुरक्षेची धुरा; १९ ऑपरेटर नियंत्रण कक्षातून २४ तास ठेवणार नजर.

Ashadhi Wari Security – टाळ-मृदंगाच्या गजरात विठ्ठलनामाचा जयघोष करीत लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने वाटचाल करीत असताना त्यांच्या सुरक्षेसाठी आणखी एक “वारी” अविरत सुरू आहे. ती म्हणजे खाकी वर्दीतील पोलिसांची. भक्तीच्या या महासागरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत प्रत्येक वारकऱ्याच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र पहारा देणाऱ्या पुणे पोलिसांच्या दळणवळण व माहिती-तंत्रज्ञान विभागाचे पोलीस सहाय्यक आयुक्त विवेक पवार यांच्याकडे यंदाच्या वारीच्या तंत्रज्ञानाधारित सुरक्षा व्यवस्थेची धुरा आहे.
आषाढी वारीत लाखो भाविक सहभागी होत असल्याने गर्दी नियंत्रण, वाहतूक नियोजन, हरवलेल्या व्यक्तींचा शोध, संशयास्पद हालचालींवर लक्ष आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळणे हे मोठे आव्हान असते. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी यंदा कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), ड्रोन, फेस रिकग्निशन, जीपीएस ट्रॅकिंग आणि अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणेचा प्रभावी वापर करून सुरक्षेचे नवे मॉडेल उभे केले आहे.
संपूर्ण पालखी मार्गावर बसविण्यात आलेल्या सुमारे तीन हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील थेट चित्रफितींवर नियंत्रण कक्षातून २४ तास नजर ठेवली जात आहे. १९ प्रशिक्षित ऑपरेटर प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवतात. एआय प्रणाली गर्दी वाढल्याचा इशारा देताच संबंधित पोलिस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणते. पालखी मार्गावरील २८ ठिकाणी बसविण्यात आलेले फेस रिकग्निशन कॅमेरे,
हरवलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी आणि संशयितांची ओळख पटविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. प्रवेश आणि निर्गमन मार्गांवरील विशेष कॅमेऱ्यांमुळे प्रत्येक ठिकाणची गर्दी आणि भाविकांची संख्या अचूकपणे समजत असल्याने नियोजन अधिक परिणामकारक झाले आहे. एआय प्रणाली रस्त्यावर पडून राहिलेली संशयास्पद बॅग, झाड कोसळणे किंवा इतर अडथळ्यांची त्वरित सूचना देते.
त्याचवेळी ड्रोनच्या माध्यमातून पालखी मार्ग, पार्किंग व्यवस्था, गर्दीचे स्वरूप, राँग साईडने येणारी वाहने आणि हेड काउंटवर सातत्याने नजर ठेवली जात आहे. सीसीटीव्हीचे कव्हरेज मर्यादित असलेल्या भागात ड्रोन प्रभावी ठरत आहेत. आपत्कालीन परिस्थितीसाठी १९ मोबाईल सर्व्हिस व्हेईकल्स सज्ज ठेवण्यात आली असून, मोबाईल नेटवर्कवर ताण आल्यासही संपर्क खंडित होऊ नये म्हणून ३०० ते ४०० वॉकी-टॉकींचे स्वतंत्र कम्युनिकेशन नेटवर्क उभारण्यात आले आहे.
याशिवाय दोन अँटी-ड्रोन गन्स संशयास्पद ड्रोन निष्प्रभ करण्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. पालखीच्या रथावर बसविलेल्या जीपीएस ट्रॅकरमुळे त्याच्या प्रत्येक हालचालीवर नियंत्रण कक्षातून थेट नजर ठेवली जात आहे. या संपूर्ण व्यवस्थेसाठी आठ हजारांहून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. वारकऱ्यांसाठी ही सुरक्षा यंत्रणा दिसत नसली तरी त्यांच्या प्रत्येक पावलामागे खाकीचा सावध पाहारा आहे.
श्रद्धा आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत विवेक पवार यांच्या नेतृत्वाखाली पुणे पोलिसांनी यंदाच्या वारीत सुरक्षिततेचा नवा आदर्श निर्माण केला असून, विठुरायाच्या भेटीसाठी निघालेल्या लाखो भाविकांसाठी हे खाकीतील वारकरीच खऱ्या अर्थाने अदृश्य रक्षक ठरले आहेत.






