Leopard Poaching: वन विभागाची मोठी कारवाई! बिबट्याची कातडी आणि नखे विकताना दोघे रंगेहाथ अटक
Leopard Poaching: वन्यजीव शिकार आणि तस्करीप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल; तस्करीच्या आंतरजिल्हा साखळीचा शोध घेण्यासाठी वन विभागाकडून तपास सुरू.

Leopard Poaching – बिबट्याची शिकार करून त्याची कातडी आणि अन्य अवयवांची तस्करी करणाऱ्या दोघांना वन विभागाने सापळा रचून पकडले. बुधवारी (दि. ८ जुलै) ही कारवाई केली. त्यांच्याजवळून बिबट्याच्या कातडीसह, १५ नखे, दोन सुळेदात हस्तगत करण्यात आले. आदेश रेवजी पारधी (वय २५) आणि शुभम बाळू पारधी (वय २१) अशी आरोपींची नावे असून, दोघेही जुन्नर तालुक्यातील वरखेडे डिंगोरे येथील राहणारे आहेत.
दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना खबर मिळाल्यानंतर त्यांनी संगमवाडी परिसरातील पर्पल कॅफेजवळ सापळा रचला आणि दोघांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई मुख्य वनसंरक्षक आशिष ठाकरे, उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस, वनविभागीय अधिकारी अमोल थोरात,
सहाय्यक वनसंरक्षक विशाल चव्हाण, सहाय्यक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी ऋषिकेश चव्हाण आणि नंदकुमार पाटील यांच्या पथकाने केली. या कारवाईमध्ये वनपाल आर. टी. रुपनवर, वैभव बाबर, शीतल खंडके, वनरक्षक वैभव कंक, अंकुश कचरे, अनिल राठोड, रमेश शिंदे, अशोक गायकवाड, सुरेश बर्ले, दयानंद ऐतवाड, गणेश यमगर, ओंकार गुंड, उल्हास मोरे आदी सहभागी झाले होते.
“वन विभागाने बिबटाच्या अवयवांच्या तस्करीसंदर्भात प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे तात्काळ कारवाई करून संबंधित आरोपींना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी तपास सुरू असून, तस्करीच्या साखळीत सहभागी असलेल्या इतर व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. वन्यजीवांची शिकार आणि तस्करी हा गंभीर गुन्हा असून, नागरिकांनी वन्यजीवांविषयी संशयास्पद हालचाली आढळल्यास वन विभाग किंवा १९२६ या हेल्पलाइनवर माहिती द्यावी.”
– अभिजीत वायकोस, उपवनसंरक्षक, पुणे विभाग





