Ashadhi Wari: मावळातून २५ हजार वारकरी पंढरीला निघणार! २१ दिंड्या सज्ज, विठुनामाच्या गजराने आसमंत दुमदुमला
Ashadhi Wari: भंडारा डोंगर, घोरवडेश्वर ते कोंडेश्वर दिंडी; जगद्गुरु संत तुकाराम आणि माऊलींच्या पालखी सोहळ्यात मावळातील २१ दिंड्यांचा दिमाखदार सहभाग.

Ashadhi Wari – श्रीक्षेत्र पंढरपूरच्या आषाढी वारीची ओढ लागलेले वारकरी आता पंढरीच्या वाटेवर निघण्यासाठी सज्ज झाले आहेत. विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाची आस, मुखी अखंड हरिनाम आणि हृदयात भक्तिभाव घेऊन यंदा मावळातून सुमारे २० ते २५ हजार वारकरी २१ दिंड्यांसह पायी वारीसाठी प्रस्थान करणार आहेत. त्यामुळे संपूर्ण मावळ परिसर विठ्ठलनामाच्या गजराने भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे.
श्रीक्षेत्र पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान मंगळवारी (दि. ७), तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान बुधवारी (दि. ८) होणार आहे. या पार्श्वभूमीवर मावळातील वारकऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून तयारी सुरू केली असून आता सर्व तयारी पूर्ण झाली आहे. १८ ते १९ दिवसांच्या पायी प्रवासासाठी वारकऱ्यांनी अंथरूण-पांघरूण, रेनकोट, छत्री, बसण्यासाठी प्लास्टिक अथवा कागद, ताट-वाटी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,
रोजच्या वापराचे कपडे, औषधे तसेच भजन-कीर्तनासाठी आवश्यक साहित्याची तयारी केली आहे. सोबतच पावसाळा लक्षात घेत आवश्यक खबरदारी देखील घेण्यात आली आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने मावळातील गावागावांतही भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून विठ्ठलाच्या नामस्मरणात वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होण्यास सज्ज झाले आहेत. ज्ञानोबा-तुकारामच्या अखंड जयघोषात मावळातून निघणाऱ्या या दिंड्या भक्ती, परंपरा आणि सामाजिक एकतेचा संदेश देत पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत.
२१ दिंड्यांचा पंढरीकडे प्रस्थान
यंदा मावळ तालुक्यातून २१ प्रमुख दिंड्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी, संताजी जगनाडे महाराज पालखी आणि गवरशेठ वाणी पालखी सोहळ्यासोबत पायी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहेत. या दिंड्यांमध्ये मावळ तालुका दिंडी समाज, पवन मावळ दिंडी समाज, घोरवडेश्वर दिंडी, कोंडेश्वर दिंडी, तळेगाव माळवाडी दिंडी,
संत सेना दिंडी क्रमांक १ व २, संत नामदेव दिंडी, भामचंद्र दिंडी, पोटोबा महाराज दिंडी, संत तुकाराम प्रासादिक दिंडी क्रमांक १ व २, संताजी जगनाडे पालखी सोहळा, श्रीक्षेत्र भंडारा डोंगर दिंडी, गवरशेठ वाणी दिंडी, चक्रेश्वर दिंडी, संगमेश्वर दिंडी (वारंगवाडी पंचक्रोशी), गोरोबाकाका दिंडी मावळ, भैरवनाथ दिंडी (आढे), बोधले बुवा दिंडी आणि वैकुंठगमन दिंडी यांचा समावेश आहे.






