पिंपरी – सरकारी रेशन दुकानातील माल चढ्या दराने काळ्या बाजारात विकणाऱ्या तिघांना सामाजिक सुरक्षा पथकाने अटक केली आहे. यांच्यासह दोन रेशन दुकानदारांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंदन द्वारका गुप्ता (वय 38), रितीक चंदन गुप्ता (वय 18), शंकर आयोध्या गुप्ता (वय 22, तिघेही रा. रहाटणी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यांच्यासह रेशन दुकानदार थोरात ( वय 40, रा आनंदनगर झोपडपट्टी चिंचवड, पुणे), जांभळे (वय 30, रा. आनंदनगर, झोपडपट्टी, चिंचवड, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी (दि. 27) सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना माहिती मिळाली की, काळेवाडी येथून सरकारी रेशन दुकानातील माल काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री केला जात आहे. त्यानुसार पोलिसांनी पवारनगर गार्डनच्या बाजूला काळेवाडी येथे सापळा लावून छापा टाकला. त्यात दोन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. तसेच तिघांना ताब्यात घेतले.
तिघांकडून 37 हजार 400 रुपयांची 34 गव्हाची पोती, 67 हजारांच्या दोन दुचाकी असा एकूण एक लाख चार हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रेशन दुकानदार थोरात आणि जांभळे यांनी अटक केलेल्या तीन आरोपींना रेशन दुकानात वितरित होणारा गहू पुरवला असल्याचे निष्पन्न झाले आहे.