Arjun Tendulkar Bat : सचिनच्या बॅटीचं वजन ऐकून ऋषभ अवाक्! अर्जुनने सांगितला तेंडुलकर घराण्याचा ‘सिक्रेट’ फॉर्म्युला, पाहा VIDEO
Arjun Tendulkar Bat : इकाना स्टेडियमवरील सराव सत्रादरम्यानचा अर्जुन आणि कर्णधार ऋषभ पंत यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Arjun Tendulkar Bat Weight Discuss with Rishabh Pant : आयपीएल २०२६ चा हंगाम २८ मार्चपासून सुरू होत असून, सर्व १० संघांनी कंबर कसली आहे. यंदाच्या हंगामात अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सची साथ सोडून लखनऊ सुपर जायंट्स (LSG) कडून खेळताना दिसणार आहे. इकाना स्टेडियमवरील सराव सत्रादरम्यानचा अर्जुन आणि कर्णधार ऋषभ पंत यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अर्जुनने दिलेले उत्तर ऐकून पंत अवाक् –
लखनऊ सुपर जायंट्सच्या सराव शिबिरात सरावादरम्यान कर्णधार ऋषभ पंतने अर्जुनला त्याच्या बॅटीच्या वजनाबद्दल विचारले असता, अर्जुनने दिलेले उत्तर ऐकून पंत अवाक झाला. अर्जुनने सांगितले की, तो १२०० ते १२२० ग्रॅम वजनाच्या जड बॅटीने खेळतो. इतकेच नाही तर, “बाबा (सचिन तेंडुलकर) तर १३१०-१३१५ ग्रॅम वजनाची बॅट वापरायचे, मी १२०० ग्रॅमपेक्षा हलक्या बॅटीने कधीच खेळत नाही,” असा खुलासाही अर्जुनने केला.
जड बॅट वापरण्यामागचं कारण काय?
Already loving this new Rishabh-Arjun bond 🥹❤️💙 pic.twitter.com/pa79YqebbU
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) March 18, 2026
अर्जुनच्या मते, जड बॅटमुळे चेंडू केवळ बॅटीला स्पर्श झाला तरी वेगाने सीमापार जातो. क्रिकेट जगतात सचिन तेंडुलकरच्या जड बॅटीची नेहमीच चर्चा असायची. आता अर्जुन देखील आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्याच परंपरेने फलंदाजी करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
“लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सरावाला गेलास?” – पंतची गुगली
या गप्पांदरम्यान ऋषभ पंतने अर्जुनच्या शिस्तीचे आणि उत्साहाचे कौतुक केले. पंत म्हणाला, “तू तर तुझ्या लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी युवी पाजीसोबत ट्रेनिंग गेला होतास, तुझा उत्साह खरंच दाद देण्यासारखा आहे.” तसेच, कोणत्याही मदतीसाठी हक्काने सांग, असे म्हणत पंतने अर्जुनचे संघात स्वागत केले.
लखनऊ नव्या जोमाने सुरुवात करण्यास उत्सुक –
गेला हंगाम लखनऊसाठी निराशाजनक ठरला होता. त्यामुळे यंदा ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली संघ नव्या दमाने मैदानात उतरणार आहे. लखनऊ सुपर जायंट्सचा पहिला सामना १ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणार असून, अर्जुन तेंडुलकर आपल्या नव्या संघासाठी कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





