अॅपलचे भारतातील चौथे स्टोअर पुण्यात 4 सप्टेंबरला सुरू

नवी दिल्ली – आयफोन उत्पादन करणार्या अँपल कंपनीने आपले चौथे स्टोअर पुण्यात 4 सप्टेंबर रोजी सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. या अगोदर मुंबई, दिल्ली, बंगळुरू या शहरामध्ये अॅपल कंपनीने आपले स्टोअर सुरू केले होते. पुण्यात या कंपन्याने आपले चौथे स्टोअर्स सुरू करण्याचे ठरविले आहे.
कंपनीने यासंदर्भात जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पुण्यातील ग्राहकांना आमच्या विविध उत्पादनांचा अनुभव घेण्यासाठी हे स्टोअर उपयोगी पडणार आहे. या स्टोअर मध्ये कार्यक्षम कर्मचारी असल्यामुळे विविध उत्पादनांचा उपयोग, कार्यक्षमता, उपयोगिता या संदर्भात ग्राहकांना प्रत्यक्ष माहिती उपलब्ध होणार आहे. दोन सप्टेंबर रोजी बंगळुरमध्ये स्टोअर सुरू करण्यात आले होते. कोरेगाव पार्कमधील एका मॉलमध्ये हे स्टोअर सुरू करण्यात येणार असल्याचे समजले जाते.
आमच्या उत्पादनांना भारतीय ग्राहक उत्तम प्रतिसाद देत आहेत. विशेषतः मोठ्या शहरातील नागरिक आयफोनचा वापर मोठ्या प्रमाणात करीत आहेत. त्यामुळे आमची भारतातील विक्री वाढण्यास मदत होत आहे. या कंपनीने भारतामध्ये आपली विविध उत्पादन केंद्र सुरू केली आहेत.
या उत्पादन केंद्रातून भारतीय बाजारपेठेबरोबरच जागतिक बाजारपेठेसाठी आयफोनची निर्मिती केली जाते. विशेष म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपल कंपनीने अमेरिकेतच उत्पादन घ्यावे असा आग्रह केला असला तरी या कंपनीच्या भारतीय उत्पादनावर आतापर्यंत तर कसलाही परिणाम झालेला नाही.





