Tushar Gandhi on Rahul Gandhi : इस्रायलवरील राहुल गांधींच्या भूमिकेमुळे राजकीय गदारोळ; तुषार गांधींनी साधला निशाणा, नेमकं काय म्हणाले राहुल गांधी ?
Tushar Gandhi on Rahul Gandhi : महात्मा गांधींचे पणतू आणि लेखक तुषार गांधी यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या इस्रायलबाबतच्या वक्तव्याशी असहमती दर्शवली आहे.

Tushar Gandhi on Rahul Gandhi : महात्मा गांधींचे पणतू आणि लेखक तुषार गांधी यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या इस्रायलबाबतच्या वक्तव्याशी असहमती दर्शवली आहे. त्यांनी या संदर्भात इंस्टाग्रामवर अनेक पोस्ट केल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे, “इस्रायलला पाठिंबा देण्याच्या राहुल गांधींच्या भूमिकेशी मी पूर्णपणे असहमत आहे.”
तुषार गांधी म्हणाले की, “सामरिक हितसंबंध नरसंहारापेक्षा मोठे किंवा अधिक महत्त्वाचे असू शकत नाहीत. आपण गाझा आणि पॅलेस्टाईनच्या लोकांसोबत उभे राहिले पाहिजे.”
दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “इस्रायलची निर्मिती अनैतिक आणि बेकायदेशीर आहे. झिओनिस्ट राज्याला दिलेला कोणताही प्रतिसाद पॅलेस्टिनींविरुद्ध केलेल्या गुन्ह्यांवर आधारित असला पाहिजे.”
तुषार गांधी काय म्हणाले ? Tushar Gandhi on Rahul Gandhi :
गांधी म्हणाले की, “झिओनिस्टांनी त्यांच्या स्थापनेपासून पॅलेस्टिनींवर अत्याचार आणि गुन्हे केले आहेत आणि त्यांची घरे व जमिनी हिसकावून घेतल्या आहेत. त्यामुळे, बेकायदेशीर झिओनिस्ट राज्याचे गुन्हे आणि हमास किंवा पॅलेस्टिनींना पाठिंबा देणाऱ्या इतर कोणत्याही संघटनेच्या कृतींमध्ये कोणतीही तुलना किंवा संतुलन असू शकत नाही.
पिनारयी विजयन यांचा हल्ला
सीपीआय (एम) चे ज्येष्ठ नेते आणि केरळचे माजी मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांनी शनिवारी राहुल गांधींवर टीका केली. इस्रायलसोबत अधिक घनिष्ठ संबंधांचे समर्थन करणाऱ्या गांधींच्या वक्तव्यांवर त्यांनी निशाणा साधला आणि पॅलेस्टिनी मुद्द्यावर त्यांच्यावर ढोंगीपणाचा आरोप केला.
ट्विटरवरील एका पोस्टमध्ये ते म्हणाले की, “ज्यावेळी गाझामध्ये भीषण हत्याकांड घडत आहे आणि हजारो निष्पाप मुले मारली जात आहेत, त्यावेळी राहुल गांधी उघडपणे इस्रायलसोबत अधिक घनिष्ठ संबंधांचे समर्थन करत आहेत आणि या हत्यांसाठी जबाबदार असलेल्या देशाकडूनच शस्त्रे खरेदी करत आहेत.”
काँग्रेस प्रवक्ते काय म्हणाले?
काँग्रेसचे प्रवक्ते सुरेंद्र राजुपत यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी ट्विटरवर पोस्ट करत म्हटले, “तुषारजी, पूर्ण आदराने मी तुम्हाला फक्त एवढेच सांगू इच्छितो की, राहुलजींच्या शब्दांचा विपर्यास करू नका. जे ते बोललेच नाहीत, ते तुम्ही कसे बोलू शकता?” ते पॅलेस्टाईनच्या विरोधात काहीही बोलले नाहीत, उलट त्यांनी गाझावरील इस्रायलच्या हल्ल्याला विरोध केला होता.
राहुल गांधी काय म्हणाले? Tushar Gandhi on Rahul Gandhi :
शिकागो विद्यापीठात बोलताना राहुल गांधी म्हणाले की, भारताचे परराष्ट्र धोरण देशाच्या हितावर आधारित असले पाहिजे. “मी इस्रायलसोबतच्या मजबूत संबंधांना पाठिंबा देतो. आमचे काही सामरिक हितसंबंध आहेत, ज्यात आमच्या सैन्यासाठी सर्वोत्तम शस्त्रे खरेदी करणे समाविष्ट आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की आपण गाझा प्रश्नावर गप्प बसावे.”
याव्यतिरिक्त, राहुल गांधींनी ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यांचा आणि निष्पाप लोकांच्या हत्येचा निषेध केला आणि गाझामधील इस्रायलच्या कृतींवर टीका केली. एका चुकीचे समर्थन दुसऱ्या चुकीने करता येणार नाही, यावर त्यांनी जोर दिला.
भारत-इस्रायल संबंध संपवण्याची मागणी
सीपीआय (एमएल) लिबरेशनने भारत आणि इस्रायलमधील संबंध संपवण्याची मागणी केली आहे. सीपीआय (एमएल) लिबरेशनचे सरचिटणीस दिपांकर भट्टाचार्य यांनी इस्रायलला नरसंहारक राजवट म्हटले आणि सांगितले की, जगभरातून निषेध होत असूनही मुले, महिला आणि नागरिकांची कत्तल करणाऱ्या देशासोबत कोणतेही सामरिक संबंध असू शकत नाहीत.






