पॅरिस ऑलिम्पिकमधून आणखी एक माहिती समोर; कुस्तीपटू अंतिम पंघालवर कारवाई, पॅरिस सोडण्याचे दिले आदेश

Action Against Antim Panghal In Olympics 2024| विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील सुवर्णपदकाच्या सामन्यापूर्वी अपात्र ठरवण्यात आले आहे. विनेश फोगाटचे वजन 100 ग्रॅमने वाढले होते, त्यामुळे तिला पॅरिस ऑलिम्पिकसाठी अपात्र ठरवण्यात आले. या बातमीने देशभरात नाराजी पसरली आहे. यातच आता भारताची महिला कुस्तीगीर अंतिम पंघाल अडचणीत सापडली आहे. अंतिमची पॅरिस ऑलिम्पिकमधून हकालपट्टी करण्यात येणार आहे. नेमकं काय घडले? ज्यामुळे अंतिमवर ही कारवाई करण्यात आली. त्याबद्दल जाणून घेऊयात …
अंतिमची रवानगी पुन्हा भारतात करण्याचा निर्णय
अंतिमच्या बहिणीला चुकीचं अॅक्रिडेशन कार्ड म्हणजेच ओळखपत्र दाखवून ऑलिम्पिक कॅम्पसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करताना सुरक्षा अधिकाऱ्यांनी पकडलं आणि फ्रेंच अधिकाऱ्यांकडून शिस्तभंगाचा आरोप करण्यात आला. या प्रकरणाची भारतीय ऑलिम्पिक संघटनेने गंभीर दखल घेतली आहे. त्यानंतर भारतीय कुस्तीपटू अंतिम, तिची लहान बहिण आणि सपोर्ट स्टाफची रवानगी पुन्हा भारतात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Action Against Antim Panghal In Olympics 2024|
दरम्यान, ऑलिम्पिक व्हिलेज हे खास ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या सोयीसाठी तयार करण्यात आले आहे. येथे प्रवेशासंदर्भातील नियम फार कठोर आहेत. या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी प्रत्येक खेळाडूला विशेष कार्ड देण्यात आले आहेत. अंतिमच्या नावाने असलेले हेच कार्ड तिच्या बहिणीने वापरण्याचा प्रयत्न करुन नियमांचं उल्लंघन केल्याने तिच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. आता या कारवाईमुळेच अंतिमला देखील पॅरीस सोडावं लागणार आहे.
दरम्यान, पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या पहिला सामना गमावल्यानंतर कुस्तीपटू अंतिम स्पर्धेतून बाहेर पडली. 53 किलो वजनी गटातून खेळताना पात्रता फेरीच्या पहिल्याच सामन्यात अंतिम 0-10 ने पराभूत झाली होती.
अंतिमच्या बहिणीची पोलिसांकडून चौकशी
त्यामुळे आता अंतिमला भारताच्या खेळाडूंबरोबर राहता येणार नाही. अंतिमच्या बहिणीची पोलिसांनी चौकशी केली आणि तिचा जबाब नोंदवण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर 19 वर्षीय ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन कुस्तीपटू अंतिमलाही तिचा जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांनी बोलावलं.
दरम्यान, अंतिमचे वैयक्तिक सपोर्ट स्टाफ विकास आणि भगत पॅरिसमध्ये मद्यधुंद अवस्थेत टॅक्सीमधून फिरत होते आणि त्यांनी टॅक्सीचं भाडं देण्यास मनाई केली, त्यामुळे त्यांच्याही अडचणींत वाढ झाली आहे.
हेही वाचा:
‘मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर मिळाली असती तर…’ उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मोठे विधान





