‘मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर मिळाली असती तर…’ उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मोठे विधान

Ajit Pawar । महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाच्या ऑफरबाबत मोठा खुलासा केला आहे. ‘योद्धा कर्मयोगी-एकनाथ संभाजी शिंदे’ या चरित्रग्रंथाच्या लोकार्पणप्रसंगी बोलतांना अजित पवार यांनी त्याच्या शैलीत राजकारणात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पेक्षा मी मोठा असल्याचे सांगितले. यावेळी तेथे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले,’जर भाजप आणि शिवसेनेने मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली असती तर मी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत आणले असते. सगळे पुढे सरसावले आणि मी मागे राहिलो. मी गंमतीने काही लोकांना सांगितले की, तुम्ही (स्पष्टपणे भाजपकडे बोट दाखवत) एकनाथ शिंदे यांना इतके आमदार घेऊन येण्यास सांगितले होते आणि मला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली असती तर मी, संपूर्ण पक्षाला सोबत आणले असते.’ असा दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान, अजित पवार यांनी जुलै 2023 मध्ये त्यांचे काका शरद पवार यांच्या विरोधात बंड केले आणि राष्ट्रवादीपासून वेगळे होऊन भाजप-शिवसेना सरकारमध्ये सामील झाले.
Ajit Pawar । मुख्यमंत्री शिंदे-अजित पवार यांच्यासारखा कोणी नाही
ते पुढे म्हणाले, ‘आयुष्यात जे काही घडते ते नियतीने ठरवले जाते. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात 39 आमदारांसह बंड पुकारले होते आणि ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पडले होते. यानंतर शिंदे मुख्यमंत्री झाले. अजित पवार म्हणाले की, ‘शिंदे यांना सतत लोक वेठीस धरतात मात्र मी अनेक मुख्यमंत्री पाहिले आहेत, पण शिंदे यांच्यासारखा कोणीच नाही.’
यानंतर याच कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भाष्य केले की, ‘त्याच विधानसभेच्या कार्यकाळात (2019 ते 2024 दरम्यान) मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि नंतर उपमुख्यमंत्री बनलेली व्यक्ती मीच आहे. तसेच याच काळात पवार उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि नंतर उपमुख्यमंत्रीही झाले.’
Ajit Pawar । मुख्यमंत्री शिंदे यांनी ही घोषणा केली
पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या दोन वर्षात विकास आणि कल्याणकारी योजनांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतरही आपले सरकार सत्ता राखेल, असा विश्वास व्यक्त केला.





