काँग्रेसमध्ये पुन्हा गटबाजीचा भडका? महापालिका निवडणुकीपूर्वी नियुक्त्यांवरून दोन गट आमने-सामने

प्रभात वृत्तसेवा
पुणे – आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर काँग्रेसमध्ये पुन्हा गटबाजीचा भडका उडाला आहे. नव्या नियुक्त्यांवरून दोन गट आमने-सामने येत असून, संघटन बळकट करण्याऐवजी अंतर्गत मतभेद अधिकच तीव्र होत असल्याचे चित्र आहे.महापालिका निवडणूक लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून पुण्यात काही नियुक्त्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यात संजय बालगुडे, अविनाश बागवे, सुनील मलके आणि भाऊसाहेब आसबे यांची नावे असून, त्यांना प्रभागनिहाय प्रमुख नेमण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
पुण्यातील १६५ प्रभागांमध्ये प्रत्येक प्रभागासाठी एक प्रमुख आणि सहायक व्यक्ती नेमली जाणार आहे.या संदर्भातील संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यात म्हटले आहे की, मनपा निवडणूक आणि संघटन मजबूत करण्यासाठी प्रत्येक प्रभागातून एक प्रमुख निवडायचा आहे. इच्छुकांनी आपली नावे, पत्ते आणि क्रमांक दिलेल्या नेत्यांकडे द्यावेत. मात्र, या मेसेजवरूनच काँग्रेसमध्ये वाद पेटला आहे.
काँग्रेसच्या एका गटाकडून या नियुक्त्या फेक असल्याचा दावा करण्यात आला असून, फेसबुक किंवा व्हॉट्सॲपवरून नियुक्त्या जाहीर करण्याची पद्धत काँग्रेसमध्ये नाही. अशा नियुक्त्यांचा अधिकार शहर काँग्रेसकडेच असतो, असे सांगण्यात येत आहे. तसेच, प्रदेश काँग्रेसकडून अधिकृत ई-मेल आल्यानंतरच नियुक्त्या ग्राह्य धरल्या जातात. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अफवांपासून सावध राहावे, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, दुसरा गट मात्र या नियुक्त्या योग्य असल्याचे सांगत आहे. ते कार्यकर्त्यांकडून नावे मागवत असून, प्रशिक्षण आणि संघटन शिबिरांची तयारी सुरू केल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच काँग्रेसचे दोन्ही गट आमने-सामने येऊन पुन्हा एकदा अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे.





