पीटर, स्कॉट, हॉवर्ड…! ट्रम्पच्या टॅरिफ धोरणामागील सूत्रधार ; ‘या’ त्रिमूर्तीने जगाला हादरवले
Updated On:

America Reciprocal Tariff । अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ७० हून अधिक देशांना परस्पर करातून ९० दिवसांची सूट जाहीर केली आहे, परंतु चीनवर १२५% इतका प्रचंड कर लादला आहे. यामुळे अमेरिका-चीनमधील तणाव वाढला आहे. दरम्यान, या टॅरिफ धोरणामागील सूत्रधार कोण, याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. ट्रम्प सुरुवातीपासूनच टॅरिफचे समर्थक राहिले आहेत. त्यांचा विश्वास आहे की परदेशांनी अमेरिकेची आर्थिक लूट केली आहे, जी आता थांबवण्याची वेळ आली आहे.
पीटर नवारो चीनचे कट्टर टीकाकार America Reciprocal Tariff ।
दरम्यान, अमेरिकेच्या टॅरिफ मागील कर्ता धर्ता कोण आहे याची चर्चा सुरु आहे. या धोरणामध्ये तीन महत्वाच्या व्यक्तींचा सहभाग पाहायला मिळत आहे. या धोरणामागील प्रमुख व्यक्ती म्हणजे ट्रम्प यांचे आर्थिक सल्लागार पीटर नवारो. नवारो हे चीनचे कट्टर टीकाकार मानले जातात. त्यांनी २००६ मध्ये ‘चायना वॉर्स’ आणि २०११ मध्ये ‘डेथ बाय चायना’ ही पुस्तके लिहिली, ज्यात त्यांचे चीनविरोधी विचार स्पष्ट आहेत. २०१७-२१ दरम्यान व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्रीय व्यापार परिषदेचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. संरक्षणवाद आणि उच्च करांद्वारे अमेरिकन उत्पादन वाढवण्याच्या बाजूने ते आहेत. नवारो यांनी परस्पर शुल्काची कल्पना मांडली, ज्यामुळे व्यापार तूट संतुलित होईल आणि परदेशांना धोरणे बदलण्यास भाग पाडले जाईल.
स्कॉट यांच्याकडून अर्थव्यवस्थेला फायदा होण्याचा दावा
अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसंट यांनीही या धोरणाला पाठिंबा दिला. हेज फंड मॅनेजर असलेले बेसंट यांचा विश्वास आहे की, टॅरिफमुळे व्यापार संतुलन तर होईलच, पण अमेरिकन अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. शेअर बाजारात घसरण झाल्यानंतरही त्यांनी मंदीचा इन्कार करत अर्थव्यवस्थेला फायदा होईल, असा दावा केला.
हावर्ड यांनीच चीनवर कर लादण्याचा दिला सल्ला America Reciprocal Tariff ।
ट्रम्प यांचे विश्वासू आणि वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनीही टॅरिफ धोरण राबवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. गुंतवणूक बँकर असलेले लुटनिक यांनी चीन आणि व्हिएतनामसारख्या देशांवर जास्त कर लादण्याचा सल्ला दिला केली. त्यांचा युक्तिवाद आहे की, अमेरिका या देशांमधून जास्त आयात करते, जे संतुलित करणे गरजेचे आहे. लुटनिक यांनी टॅरिफला वाटाघाटीचे साधन बनवत इतर देशांना अमेरिकन उत्पादनांसाठी बाजारपेठ उघडण्यास भाग पाडले. हे धोरण अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वाचे मानले जाते. मात्र, या टॅरिफमुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता वाढली आहे.





