मिनियापोलीस – अमेरिकेतील मिनियापोलीस भागात इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी स्थलांतरितांविरोधातल्या कारवाईदरम्यान केलेल्या गोळीबारात आणखी एक व्यक्ती ठार झाला आहे. यामुळे इमिग्रेशन अधिकाऱ्यांविरोधात मोठा असंतोष निर्माण झाला आहे. मिनियापोलीसच्या रस्त्यांवर निषेधमोर्चा काढण्यात आला. काही आठवड्यांपुर्वीच इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात एक महिला ठार झाली होती. त्या घटनेमुळे प्रशासनाविरोधात अजूनही उग्र निदर्शने होत असतानाच तशीच दुसरी घटना घडली आहे. अलेक्स प्रेट्टी असे गोळीबारात ठार झालेल्या ३७ वर्षीय व्यक्तीचे नाव असून ते रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील परिचारक होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या स्थलांतरितांच्याविरोधातल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी आंदोलनात ते सहभागी झाले होते. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते ठार झाल्यावर संतप्त जमावाने इमिग्रेशन अधिकाऱ्यांवर हल्ला केला. पण पोलिसांनी लाठीमार करून आंदोलकांना पिटाळून लावले. इमिग्रेशन कार्यालयाला आंदोलकांनी वेढा घातला असून तणाव वाढलेला पाहता मिनियापोलीस नॅशनल गार्ड घटनास्थळी पाठवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांना गोळीबार का करावा लागला, याबाबतचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही, असे पोलीस प्रमुख ब्रायन ओहारा यांनी सांगितले. एक व्यक्ती हँडगन घेऊन अधिकाऱ्यांसमोर आला होता. मात्र अधिकाऱ्यांनी त्याला अडवण्याचा आणि शस्त्र काढून घेण्याचा प्रयत्न केल्यावर त्याने विरोध केल्याने फेडरल अधिकाऱ्यांना आत्मरक्षणासाठी गोळीबार करावा लागला, असे डिपार्टमेंट ऑफ होमलॅन्ड सिक्युरीटीच्या प्रवक्त्या ट्रिसिया मॅक्लाग्लिन यांनी सांगितले. मात्र सीसीटिव्हीमध्ये या व्यक्तीच्या हातात फोन होता, असे दिसले आहे. त्याच्या हातात कोणतेही शस्त्र दिसले नाही.